जेव्हा एखादा कठीण प्रसंग आपल्यासमोर येतो तेव्हा कोणता निर्णय घ्यायचा हे अनेकदा आपल्याला समजत नाही. घाईगडबडीत, टेन्शनमध्ये आपण एखादा निर्णय घेऊन मोकळे होतो. मग त्याचा निकाल कधी वाईट, तर कधी अगदीच चांगलाही ठरतो. तर आज याच गोष्टीचे एक उत्तम उदाहरण देत सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत वाटेत मेंढ्यांचा कळप उभा असतो. हा मेंढ्यांचा कळप एकाच ठिकाणी उभा असतो आणि पुढेदेखील जात नसतो. दरम्यान, एका श्वानाला रस्ता काढून, जवळील पुलावर पोहोचायचे असते. पण, तेथे कसे जायचे या विचारात त्या श्वानाला युक्ती सुचते आणि तो मेंढ्यांच्या कळपावरून उड्या मारत पटकन पुढे जाऊन पुलावर पोहोचतो. श्वानाने अशा रीतीने शोधलेला मार्ग पाहून मेंढ्याही सक्रिय झाल्या आणि त्याही पुढे सरसावल्या. हा व्हिडीओ शेअर करीत आनंद महिंद्रांनी कोणता संदेश दिला ते चला पाहू.
व्हिडीओ नक्की बघा :
व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, मेंढ्यांचा कळप एकाच ठिकाणी उभा होता. हे पाहून श्वानाने रस्ता शोधून काढला. श्वानाला पुढे जाताना पाहून मेंढ्यांचा कळप त्यांचे अनुकरण करताना दिसला. हे पाहून आनंद महिंद्रा म्हणाले, “तुमचा मार्ग स्वतः बनवा. नंतर इतर तुमचे अनुसरण (फॉलो) करतील”, अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे.
आजचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांच्या अधिकृत @anandmahindra या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून काही नेटकरी मजेशीर; तर काही जण प्रेरणादायी कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंट केली, “ऑफिसला जायला उशीर झाला की, प्रत्येक जण असे करतो.” तर, आनंद महिंद्रा यांच्या पोस्ट अतिशय मनोरंजक आणि अनोखा संदेश देणाऱ्या असतात. त्यामुळे त्यांच्या पोस्ट नेटकऱ्यांना खूप आवडतात