सुप्रसिद्ध उद्योगपती व महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. तसेच ते देश-विदेशांतील निरनिराळ्या गोष्टींची दखल घेत असतात आणि एक्स (ट्विटर)वर बऱ्याचदा त्यांच्या पोस्टमधून जुगाड, मजेशीर व अनेक कौतुकास्पद व्हिडीओ शेअर करीत असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये एक वेगळी बाजू दिसते. आज मुंबईतील ससून डॉकमधल्या जुन्या इमारतीवर काढण्यात आलेल्या चित्रांनी आनंद महिंद्रा यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
ससून डॉकमधल्या जुन्या इमारतींमध्ये मुंबई अर्बन आर्ट्स फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. आनंद महिंद्रा यांनी मुंबईतील ससून डॉकला भेट देऊन, तेथील काही फोटो त्यांनी शेअर केले आहेत. येथील जुन्या इमारतींवर केलेल्या आकर्षक कलाकारीची आनंद महिंद्रा यांनी प्रशंसा केली आहे आणि ही चित्रे त्यांनी त्यांच्या शब्दांतून ठळकपणे मांडली आहेत. ससून डॉकच्या गल्लीबोळांतून फिरण्याच्या अनुभवाला त्यांनी “निखळ आनंद” असे म्हटले आहे. एकदा पाहाच आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेली ही पोस्ट आणि कॅप्शन.
हेही वाचा…क्रिम रोल खायला आवडतात का? पाहा कारखान्यात कसे तयार होतात; VIDEO पाहून आठवतील लहानपणीचे दिवस
पोस्ट नक्की बघा…
तुम्ही पोस्टमध्ये पाहिले असेल की, आनंद महिंद्रा यांनी तीन फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “मुंबई अर्बन आर्ट फेस्टिव्हल धन्यवाद! तुम्ही मुंबईतील ससून डॉकचं आता एका मोठ्या कॅनव्हासमध्ये रूपांतर केलं आहे. तिथल्या गल्लीबोळांतून फिरणं म्हणजे एक निखळ आनंद आहे. तसेच मी काढलेल्या शेवटच्या फोटोत मी स्वतःला नशीबवान समजतो. कारण- येथे ट्रान्स्पोर्टच्याच एका अनोख्या प्रकाराचं दर्शन झालं आहे. कारण- यात एक बगळा उड्डाण करीत आहे, असं चित्रातून दर्शविण्यात आलं आहे”, अशी कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिली आहे.
मुंबईतील जुन्या इमारतींचा कायापालट करण्यासाठी मुंबईत या आर्ट्स फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिव्हलमध्ये भिंत आणि इमारतींवर नक्षीकाम करण्यात आलेले पाहायला मिळते. सोशल मीडियावर ही पोस्ट आनंद महिंद्रा यांच्या @anandmahindra अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच ही पोस्ट पाहून काही नेटकरी या आर्ट फेस्टिव्हलचे आणखीन काही फोटोज शेअर करताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत.