Anand Mahindra River Cleaning Video: आमच्याकडे नद्यांचे पार नाले झालेत हे वाक्य प्रत्येक मुंबईकराने एकदा तरी ऐकलं, वाचलं, म्हटलंही असेल. गंमत म्हणजे यातीलच अनेकांनी पुन्हा ट्रेनमधून प्रवास करताना, फिरायला गेल्यावर नद्यांमध्ये बिनधास्त निर्माल्याच्या पिशव्या, कचरा टाकलेला असतो. नंतर पावसाळ्यात जेव्हा नद्या तुंबतात तेव्हा हीच मंडळी ‘तुंबई’, ‘तुंबई’ म्हणत ओरडायला मागे पुढे पाहत नाही. अलीकडे सुदैवाने या नद्या- नाल्यांच्या प्रश्नाविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. अनेक सेवाभावी संस्था नद्यांच्या स्वच्छतेचे प्रकल्प हाती घेऊ लागले आहेत. अशावेळी याच क्षेत्रात तांत्रिक प्रगती होऊन काही खास उपकरणांची निर्मिती होणे आवश्यक आहे. अशा एखाद्या मशीनची निर्मिती आपल्याला करायची असल्यास तुमच्या या स्टार्टअपमध्ये आनंद महिंद्रा सुद्धा गुंतवणूक करण्यास इच्छूक आहेत. असं आम्ही नाही स्वतः महिंद्रा यांनी एका खास पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. विविध यंत्रांविषयी, तज्ज्ञांविषयी, कला, क्रीडा, समाजकार्य या क्षेत्रात कार्यरत व्यक्तींविषयी तसेच नवनवीन अविष्कारांविषयी महिंद्रा माहिती देत असतात तसेच त्यांचे कौतुकही करत असतात. आज सुद्धा महिंद्रा यांनी अशीच एका मशीनची स्तुती करणारी पोस्ट लिहिली आहे. महिंद्रा यांनी पोस्टमध्ये नदीची स्वच्छता करणारा रोबोट दाखवला आहे.
या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, दोन रॉड्स व त्यांना पंख्यासारखी पाती आहेत ज्याच्या मदतीने ही मशीन पाण्यात पुढे सरकत आहे. एक पट्टा या मशीनला जोडलेला आहे जो कचरा व्हॅक्युमसारखा ओढून घेत आहे आणि मग कचरा तेवढा गाळून मशीनच्या पोटात असणाऱ्या पिशवीत जमा करत आहे. व त्यातून निघालेले पाणी याच नदीत पुन्हा जमा होतेय. महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “हा नद्या स्वच्छ करणारा रोबोट चीनमध्ये बनला असावा असे वाटतेय. आपल्याकडे अशी मशीन बनणे गरजेचे आहे. आत्ता लगेच. जर कोणीही अशी मशीन बनवणार असेल तर मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे.
हे ही वाचा<< धावत्या बसला पडलं भगदाड, महिला खाली पडली तेवढ्यात… Video वर भाजपाचे नेते म्हणतात, “हीच सरकारची स्थिती..”
दरम्यान, आनंद महिंद्रा यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांच्या या विचाराचे कौतुक केले आहे तसेच काहींनी मस्करीत त्यांना ‘शार्क टॅंक’ मध्ये न जाता सुद्धा आनंद सर खरे शार्क आहेत अशा कमेंट केल्या आहेत. तुम्हाला या व्हिडीओविषयी काय वाटते हे कमेंट करून नक्की कळवा.