पोळून काढणारा, अस्वस्थ करणारा उन्हाळा संपता संपता मनाला हुरहुर लागते ती पावसाची. मग सुरू होते पावसात भिजण्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी छत्री, रेनकोट यांसारख्या साधनांच्या खरेदीची लगबग. अनेकदा एका हातात छत्री आणि दुसऱ्या हातात सामान घेऊन पावसाळ्यात जणू तारेवरची कसरतच करावी लागते. अशात जर स्वयंचलित छत्री बाजारात आली तर? या विचारानेच आनंद होत असेल ना? स्वयंचलित छत्रीच्या अशाच एका व्हिडिओने महिंद्रा आणि महिंद्रा या कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांना भुरळ पाडली आहे.

आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘एकीकडे आम्ही स्वयंचलित कार आणि गाड्यांवर लक्ष केंद्रीत करत असताना मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मी या स्वयंचलित छत्रीसाठी अधिक उत्साहित आहे,’ असं त्यांनी लिहिलंय.

एखाद्या ड्रोनप्रमाणे ही छत्री हवेत उडत असल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळतंय. त्यामुळे या छत्रीला ‘ड्रोनबेला’ असं नाव देण्यात आलं आहे. पावसात तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तुमच्या डोक्यावर ही छत्री असेल आणि तुम्हाला ती पकडण्याचीही गरज लागणार नाही. मोबाइल अॅपद्वारे ही छत्री नियंत्रित करता येते.

प्रवास करताना, पावसात उभं राहून फोटो काढताना किंवा काही खाता-पिताना तुम्हाला हातात छत्री पकडावी लागणार नाही. ठराविक अंतरावरून तुम्ही ही छत्री नियंत्रित करू शकता किंवा चालताना ती तुमच्यासोबत ठेवू शकता. आनंद महिंद्रांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या स्वयंचलित छत्रीच्या संकल्पनेच्या प्रेमात नेटकरीसुद्धा पडल्याचं दिसत आहे.

Story img Loader