Anand Mahindra Post For Hardik Pandya : भारताने तब्बल १७ वर्षांनंतर आयसीसी टी-२० विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करीत टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद जिंकले. बार्बाडोसमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यातील विजयामागे सर्वांचीच मेहनत आहे; पण यात हार्दिक पंड्याची मेहनत खूप महत्त्वाची होती. हार्दिकनं अखेरच्या षटकात संघाला विजय मिळवून दिला आणि तोच या सामन्याचा खरा हीरो ठरला. विश्वचषकाआधी हार्दिक पंड्याला अत्यंत वाईट पद्धतीनं ट्रोल केलं जात होतं; पण पंड्यानं चमकदार कामगिरी करीत या ट्रोलर्सना चांगली चपराक दिली आहे. अशात देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही हार्दिक पंड्यासाठी एक खास पोस्ट करीत त्याचं कौतुक केलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहतेही आता आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताच्या टी-२० विश्वचषक विजयानंतर महिंद्रा यांनी आज हार्दिक पंड्याचा अश्रूंनी पाणावलेल्या चेहऱ्याचा एक फोटो शेअर केला. त्याखाली त्यांनी एक अतिशय प्रेरणादायी असा मेसेज दिला आहे.

फोटोखाली कॅप्शनमध्ये आनंद महिंद्रा यांनी लिहिलं की, हा त्या खेळाडूचा चेहरा आहे; ज्याची काही काळापूर्वी मैदानावर आणि सोशल मीडियावर खूप खिल्ली उडवली जात होती. विजयानंतर त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. कारण- जेव्हा हा फोटो काढण्यात आला तेव्हा #T20WorldCupFinal च्या शेवटच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी करून आणि भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावून तो पुन्हा हीरो बनला होता. त्यातून आपल्याला शिकायला मिळते की, आयुष्यानं तुम्हाला धक्के मारले, खाली पाडलं तरी तुम्ही पुन्हा उभे राहू शकता आणि पुन्हा हीरो बनू शकता. हे माझ्यासाठी #MondayMotivation आहे.

पोस्ट तुम्ही व्हाल भावूक

तो शेवटी ओव्हर ठरली महत्वाची

पंड्याचं त्यानं टाकलेल्या शेवटच्या षटकासाठी कौतुक केलं जात आहे; ज्यात गोलंदाजी करताना त्यानं १६ धावा वाचवल्याच; पण त्याचबरोबर खतरनाक फलंदाजी करणाऱ्या डेव्हिड मिलरला बादही केले. त्याआधी हार्दिकनं आपल्या तिसऱ्या षटकामध्ये क्लासेनसारख्या धोकादायक ठरू लागलेल्या फलंदाजालाही बाद केले होते. २० व्या षटकातील शेवटचा चेंडू टाकताच हार्दिक जमिनीवर झोपला. त्यानंतर त्यानं तो आपल्या सहकाऱ्यांना मिठी मारत भेटला. यावेळी त्याच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू फारच वेदनादायी भासत होते.

या टी-२० विश्वचषकापूर्वी जे त्याच्यावर टीका करीत होते, तेच आता त्याचं कौतुक करताना थकत नाहीत. हार्दिकनं आपल्या मेहनतीच्या जोरावर हे स्थान मिळवलं आहे.

ट्रोलर्सना दिले चोख प्रत्युत्तर

आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टवर युजर्स जोरदार कमेंट्स करीत आहेत. कमेंट सेक्शनमध्येही युजर्स हार्दिकवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेत आहेत. या पोस्टवर एका युजरने लिहिलं, “हार्दिकनं मनं जिंकली आणि ज्यांनी त्याची खिल्ली उडवली त्यांना शांत केले. खरंच तो खरा मॅच विनर आहे… शाब्बास!” तर दुसऱ्या युजरनं लिहिलं की, ही लक्षात ठेवण्यासारखी नैतिक बाब आहे; परंतु हा क्षण जगणं खूप कठीण आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra motivational post hardik pandya t20 world cup emotional photo share and says his tears came from seeing redemption sjr