देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते अनेकदा भावनिक, मनोरंजन व्हिडीओ शेअर करीत असतात. काही वेळा ते कलाविश्वासंबंधित गोष्टीही शेअर करीत असतात. अशात पुन्हा एकदा आनंद महिंद्रा यांनी विधू विनोद चोप्रा आणि विक्रांत मेस्सी यांच्या ’12th Fail’ चित्रपटासंबंधित पोस्ट केली आहे. आनंद महिंद्रा यांनी ’12th Fail’ चित्रपटाला पुरस्कार देऊन गौरवल्याने ‘फिल्मफेअर’चे कौतुक केले आहे.
12th Fail हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या वास्तविक जीवनातील संघर्षावर आधारित आहे. या चित्रपटाला नुकतेच फिल्मफेअर अवॉर्ड्सने गौरवण्यात आले. या संदर्भात आनंद महिंद्रा यांनी पोस्ट करीत लिहिले, “वाहवा, @filmfare हे ओळखण्यासाठी की, साधी आणि प्रामाणिक कथा अजूनही खरोखर शक्तिशाली सिनेमाच्या केंद्रस्थानी आहे.” फिल्मफेअरने पुरस्कार सोहळ्याचा एक व्हिडीओ शेअर केला; ज्यामध्ये विक्रांत मेस्सी आणि मेधा शंकर यांच्यासह ’12th Fail’चे निर्माते आणि कलाकारांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्काराने गौरवले जात असल्याचे दिसतेय. हाच व्हि़डीओ आनंद महिंद्रा यांनीही शेअर केला आहे.
यापूर्वी ’12th Fail’ चित्रपट पाहिल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी एक्सवर चित्रपटाविषयी रिव्ह्यू शेअर केला होता. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, “शेवटी ’12th Fail’ गेल्या वीकेंडला पाहिला. या वर्षी तुम्हाला एकच चित्रपट पाहायचा असेल, तर हा पाहा.” त्यांनी पुढे चित्रपटाचे कथानक, अभिनय, कथाशैली व मुख्य आकर्षण यांविषयी आपले मत व्यक्त केले. “मिस्टर चोप्रा, ये दिल मांगे और भी ऐसे सिनेमे!” असेही त्यांनी म्हटले.
फिल्मफेअर अवॉर्ड्ससंदर्भात महिंद्रांचे हे ट्वीट आता खूप व्हायरल होत आहे. या पोस्टवर लोकांनी कमेंट्स बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले, “हा चित्रपट सर्व पुरस्कारांना पात्र आहे. व्हीएफएक्स नाहीत, फाइट सीन्स नाहीत, फक्त उत्तम कथा आणि अभिनय आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले, “वास्तविक जीवनातील नायकावरील चित्रपट.”
गुजरातमध्ये पार पडलेल्या ६९ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात विधू विनोद चोप्राच्या 12th Fail चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक), सर्वोत्कृष्ट संपादन व सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार जिंकले आहेत.