मुंबईतल्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी आढळणाऱ्या बेवारस वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. यावरच उपाय म्हणून मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईतल्या खटारा गाड्यांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. यासंदर्भातलं ट्वीटही त्यांनी केलं आहे.
संजय पांडे यांनी ट्वीट करत आतापर्यंत शहरातून ३५८ खटारा वाहने हटवल्याची माहिती दिली आहे. याच ट्वीटमध्ये त्यांनी हे काम जलद गतीने करण्यासाठी टाटा आणि महिंद्रा कंपन्यांना मदतीचे आवाहन केले आहे. आता त्यांच्या या मदतीच्या आवाहनाला महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी प्रतिसाद दिला आहे. मुंबईतील खटारा वाहने हटवण्यासाठी महिंद्रा लवकरच आपले ट्रक पाठवणार आहेत. संजय पांडे यांच्या ट्वीटला रिप्लाय देत आमची ट्रक टीम तुमच्याशी संपर्क करेल, असे आनंद महिंद्रा यांनी सांगितले आहे.
आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, ”मुंबईच्या आयुक्तपदी तुमची निवड झाल्यापासून तुम्ही जराही वेळ वाया घालवला नाही. तुमच्या विनंतीला प्रतिसाद देण्यास आम्हीही वेळ वाया घालवणार नाही. आमची महिंद्रा ट्रक टीम तुमच्याशी संपर्क करेल.”
पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, मुंबई महापालिकेच्या मदतीने शहरातून आतापर्यंत ३५८ खटारा गाड्या हटवण्यात आल्या असून हे काम अद्यापही सुरू आहे. या खटारा गाड्या देवनारपर्यंत वेगाने नेण्यासाठी मोठ्या लॉरीची गरज असल्याचं ही त्यांनी ट्वीटमध्ये सांगितलं होतं. यासाठी त्यांनी महिंद्रा आणि टाटा या कंपन्यांना टॅग करत मदतीचं आवाहन केलं होतं. त्यांच्या याच आवाहनाला आनंद महिंद्रा यांनी प्रतिसाद दिला आहे.