आजारी असतानाही गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सचिवालयात हजेरी लावली. सुमारे साडेतीन महिन्यांच्या दीर्घ काळानंतर पर्रिकर यांनी काल (दि.१ जानेवारी रोजी) आपल्या कार्यालयात दाखल झाले आहेत. यावेळी भाजपा कार्यकर्ते, नेते आणि सचिवालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. दिवसभर पर्रिकरांच्या या भेटीच्या चर्चा सोशल मिडियावर रंगल्या होत्या. काहींनी याची स्तुती केली तर काहींना त्यांनी इतके आजारी असताना काम करणे पटले नाही. पर्रिकरांच्या या अनपेक्षित उपस्थितीबद्दल महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट केले आहे. पर्रिकरांची काम करण्याच्या इच्छाशक्तीला माझा सलाम असं ते या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

आनंद महिंद्रा सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टीव्ह असतात. कधी कोणाला मदतीचा हात देऊन तर कधी एखाद्या अगदी सामान्य गोष्टीवर ते ट्विटद्वारे व्यक्त होताना दिसतात. म्हणूनच ते कालच्या पर्रिकरांच्या भेटीबद्दलही ट्विटवरून व्यक्त झाले आहेत. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘मी या व्यक्तीचा नेहमीच आदर करत आलो आहे. त्यांच्यातील प्रामाणिकपणा आणि स्वत:ला सार्वजनिक सेवेसाठी वाहून घेण्याची वृत्ती खरोखरच आदर्शवत आहे. आता, वैद्यकीय उपचार आणि खाजगी आयुष्यातील दुःख विसरून त्यांचा सेवा करण्याचा दृढनिश्चय कमालीचा आहे. त्यांना माझा सलाम!’

सप्टेंबरच्या सुरुवातीला पर्रिकर शेवटचे आपल्या कार्यालयात आले होते. त्यानंतर त्यांनी काल पुन्हा येथे हजेरी लावली. पर्रिकर आजारी असतानाही भाजपा पक्षश्रेष्ठी त्यांच्याकडून काम करुन घेत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील काही नेत्यांनी केला होता. दरम्यान, ते स्वतःहून विविध प्रकल्पांना भेटी देत असल्याचे माध्यमांतून समोर आले होते. नुकतेच त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह एका सिंचन प्रकल्पाची पाहणी करीत असल्याचा फोटो व्हायरल झाला होता.

सुमारे वर्षभरापासून पर्रिकर स्वादूपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत. या आजारावर त्यांनी सुरुवातीला मुंबईतील लीलावती रुग्णालय त्यानंतर दोनदा अमेरिकेत जाऊन उपचार घेतले. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली असली तरी अद्याप प्रकृती खालावल्याचे त्यांच्या ताज्या छायाचित्रांवरुन कळते.

Story img Loader