समुद्रसपाटीपासून कित्येक फूट खाली असलेल्या निळ्याशार पाण्यात तरंगणाऱ्या जीवांचे सुंदर जग डोक्याखाली उशी घेऊन शांतपणे पडून पाहणे.. आयुष्यातील हा किती सुंदर अनुभव असेल ना… तुम्हाला हे फक्त स्वप्नातच होऊ शकते, असे वाटेल. पण तुम्हाला माहीत आहे का, जगात अशी अनेक हॉटेल्स आहेत की, जी चक्क समुद्राच्या पाण्याखाली बांधण्यात आली आहेत. या हॉटेल्सच्या बेडरूममधून तुम्हाला समुद्रात मासे आणि वेगवेगळे जीव पोहताना दिसतील. भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी अशाच एका सुंदर अंडरवॉटर हॉटेलचा फोटो शेअर केला आहे. जो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
या हॉटेलमधून समुद्रात राहणाऱ्या माशांच्या जीवनाविषयी तुम्हाला नवीन गोष्टी कळतील. झोपेतून उठल्यानंतर आणि निवांत बसतानाही तुम्ही माशांच्या हालचाली काळजीपूर्वक पाहू शकाल. या ठिकाणी तुम्हाला त्रास देणारे कोणीही नसेल.
ही केवळ कल्पनारम्य गोष्ट आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर तसे नाही. असेच एक हॉटेल मालदीवमध्ये बांधण्यात आले आहे. ज्याचा व्हिडीओ महिंद्रा ग्रुपचे चेअरपर्सन आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे; ज्यामध्ये समुद्रसपाटीपासून सुमारे १६ फूट खाली बांधलेल्या या अंडरवॉटर हॉटेलचा सुंदर बेडरूम दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या बेडरूममध्ये टेबल, खुर्ची, बेड, लाईट्स, चार्जिंग पॉइंट यांसह सर्व आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. तर, बेडरूमच्या भिंतींना भल्यामोठ्या पारदर्शक काचा बसवण्यात आल्या आहेत. या हॉटेलमध्ये राहताना जणू काही आपण स्वर्गात राहतोय, असा भास होईल. समुद्रात पोहणारे मासे, जीव तुम्हाला अगदी जवळून पाहता येतील. तुम्ही समुद्राच्या मध्यभागी असाल आणि तुमच्या आजूबाजूला फक्त मासे असतील; काय सुंदर अनुभव असेल हा फक्त विचार करून पाहा.
जगातील पहिले अंडरवॉटर हॉटेल
आनंद महिंद्रा यांनी सांगितले की, मालदीवमध्ये असलेल्या या हॉटेलचे नाव ‘द मुराका’ आहे; जे जगातील पहिले अंडरवॉटर हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये मला एक रात्र राहण्यासही आवडणार नाही. कारण- माझे लक्ष फक्त काचेच्या छतावर असेल आणि या छताला तडे जाऊ शकतात, असा विचार मी करीत राहीन.
आनंद महिंद्रा म्हणाले की, येथे राहिल्यास वीकेंड आरामदायी होईल, असा मेसेज देऊन मला ही पोस्ट पाठवण्यात आली आहे. पण, मी प्रामाणिकपणे सांगतो मला या ठिकाणी झोप लागणार नाही. कारण- मी रात्रभर या काचेच्या छताला कुठे भेगा तर पडल्यात नाहीत ना, हे शोधत राहीन.
आनंद महिंद्रा यांच्या पोस्टवर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिले की, हाहाहा सर, हे मला टायटॅनिक पाणबुडीच्या अपघाताची आठवण करून देत आहे; पण हे खूप धोकादायक आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिलेय की, झोपण्यापासून वंचित लोकच इथे राहू शकतात. तर तिसऱ्या एका युजरने लिहिलेय की, जीवनावरील प्रेमापेक्षा जेव्हा कल्पनांवरील प्रेम अधिक असते तेव्हा अशा प्रकारे चुकीचे इनोव्हेशन तयार होतात. ओशनगेट डोळे उघडणारा होता.
द मुराका हे अंडरवॉटर हॉटेल नोव्हेंबर २०१८ मध्ये ओपन झाले. हे अंडरवॉटर हॉटेल समुद्रसपाटीपासून जवळपास १६ फूट खाली बांधण्यात आले आहे. येथे एका रात्रीचा मुक्काम करण्यासाठी ५० हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे ४१ लाख रुपये मोजावे लागतात.