World Cup Final Marble Prediction video: फिफा विश्वचषक २०२२ च्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करून ३६ वर्षानंतर जेतेपद पटकावलं. या महामुकाबल्यात अर्जेंटिनाने विश्वचषकावर प्रदीर्घ काळानंतर नाव कोरल्यानं सर्वत्र जल्लोष केला जात आहे. मात्र, अंतिम सामन्या आधी एका मार्बल प्रेडिक्शनमध्ये अर्जेंटिनाच जिंकली असल्याचं एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं होतं. हाच भन्नाट व्हिडीओ महिंद्रा समुहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही चक्रावल्याशिवाय राहणार नाही. फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना होण्याआधी महिंद्रा यांना हा व्हिडीओ मिळाला होता. त्या व्हिडीओत दाखवलेल्या गोट्यांच्या खेळातही अर्जेंटिनाने बाजी मारली होती, हे पाहून महिंद्रा यांनाही आनंद झाला आणि त्यांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
नेमकं काय आहे या व्हिडीओत?
अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स यांच्यात अंतिम सामना होण्याआधी अनेकांनी वेगवेगळ्या शक्कल लढवून त्यांच्यात अप्रत्यक्षपणे लढत लावण्याचा प्रयत्न केला. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात ‘मार्बल गेम’चा सामना पाहायला मिळत आहे. या गोट्यांच्या खेळातही दोन्ही संघामध्ये अटीतटीचा खेळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला फ्रान्स या गोट्यांच्या खेळात आघाडीवर असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. परंतु, काही सेकंदातच अर्जेंटिनाचा मार्बल फ्रान्सच्या मार्बलच्या पुढे जातो आणि विजयावर शिक्कामोर्तब करतो.
लोकांना नवनवीन गोष्टीतून प्रेरणा मिळावी, यासाठी आनंद महिंद्रा नेहमीच व्हिडीओंच्या माध्यमातून जनजागृती करताना दिसतात. फिफा विश्वचषकात अर्जेंटिनाला मिळालेला घवघवीत यश भारतीय फुटबॉल प्रेमींना एक वेगळच समाधान देऊन गेलं आहे. महिंद्रा यांनाही फुटबॉल खेळाची प्रचंड आवड आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी एक जबरदस्त व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी सुंदर कॅप्शनही दिलं आहे. ते म्हणाले, ” अंतिम सामना सुरु होण्याआधी मला हा व्हिडीओ मिळाला. हम्म…आत्तापासून होणाऱ्या प्रत्येक मोठ्या क्रिडा स्पर्धेच्या आधी मी मार्बल टेस्टसाठी विचारणा करेल.”
इथे पाहा व्हिडीओ
अर्जेंटिनाचा स्टार खेळाडून लिओनेल मेस्सी आणि फ्रान्सचा किलियन एमबाप्पे यांच्यात रंगतदार लढत पाहायला मिळाली. १२० मिनिटांच्या सामन्यात ३-३ अशी बरोबरी झाली होती. त्यामुळे स्टेडियममध्ये असलेल्या हजारो प्रेक्षकांची जेतेपदाचा गोल बघण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मेस्सी विरुद्ध एमबाप्पे यांच्यातच रंगतदार सामना होत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. मात्र सामना बरोबरीत झाल्यामुळं पेनल्टी शूटआऊटमध्ये अखेर अर्जेंटिनानेच बाजी मारली.