Ramu Ox Viral Video: निसर्गात सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणजे माणूस. माणूस स्वत;च्या बुद्धिमत्तेच्या जोरावर कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करु शकतो. पण केवळ माणूसच तर काही प्राणी देखील आहेत ज्यांच्या बुद्धिमत्तेची उदाहरणं दिली जातात. असे मानले जाते की, गोरिला इतर प्राण्यांपेक्षा फार हुशार असतात. त्यांची बुद्धिमत्ता पाहून आश्चर्य वाटते. पण बुद्धिमत्तेच्या बाबतीत बैलही कमी नाही. त्याच्याकडूनही जीवन योग्यप्रकारे जगण्याचा दृष्टीकोण शिकता येऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका बैलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याची हुशारी पाहून सर्वसामान्य लोकच नाही तर उद्योगपती आनंद महिंद्रा देखील त्याचे चाहते झाले आहेत. रामू असे या बैलाचे नाव असून तो पंजाबमधील आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सकारात्मक जीवन कसे जगायचे याचे हा बैल उत्तम उदाहरण असल्याचे आनंद महिंद्रा म्हणाले आहेत. आनंद महिंद्रांनी आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरुन रामू बैलाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी रामू बैलाचे खूप कौतुक केले आहे.

रामू बोलू शकला असता तर….

आनंद महिंद्रा यांनी रामू बैलाचा व्हिडीओ पोस्ट करत लिहिले की, ‘रामू बोलू शकला असता तर मला खात्री आहे की, त्याने जगभरातील सर्व लोक जे स्वत:ला मोटिव्हेशनल स्पीकर म्हणवतात, त्यांच्यापेक्षा चांगल्या प्रकारे सकारात्मक जीवन कसे जगायचे याचा चांगला सल्ला दिला असता.

आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक बैल दिसत आहे, जो कोणत्याही सूचनेशिवाय गोठ्यातील सर्व कामे स्वत: करतोय. सामान्यतः बैलांकडून कोणतेही काम करून घेण्यासाठी एका व्यक्तीची गरज असते. परंतु, या बैलाच्या बाबतीत असे होत नाही. कोणाच्याही मदतीशिवाय तो स्वतः गाडी ओढतो आणि माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतो. त्याला सगळे रस्ते बरोबर ठावूक आहेत. तो रोज सकाळी उठल्यावर हेच काम करतो, न थांबता न थकता तो सर्व काम करतोय. त्याची संपूर्ण दिनचर्या व्हिडीओमध्ये दाखवली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा बैलाचा हा व्हिडीओ लोकांनाही खूप आवडतोय. त्यामुळे व्हिडीओवर अनेकांनी रंजक कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने गमतीत लिहिले की, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्सपेक्षा रामू चांगला आहे. आनंद सर, तुम्ही रामूला कामावर घ्या, तो महिंद्रा ऑटो आणि टेम्पोची जागा घेईल. काहींनी म्हटले की, रामू हा फक्त मेहनती बैल नाही, तर तो प्रामाणिक आहे आणि त्याच्या जबाबदाऱ्याही समजतो. अनेकांनी बैलाच्या बुद्धिमत्तेची प्रशंसा केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra shares a video of a hardworking and honest ramu ox and compare with motivational speakers watch video sjr