उद्योगपती आनंद महिंद्रा कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांचा हजरजबाबीपणा नेटकऱ्यांना चांगलाच भावतो. म्हणूनच त्यांनी केलेल्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून नुसत्या पोस्ट करत नाही, संवादही साधतात. कधी कधी मजेशीर पोस्ट करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. आता आनंद महिंद्रा यांची पोस्ट चर्चेत आली आहे. अलीकडेच त्यांनी एका पोस्टच्या माध्यमातून टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांना भारतीय ‘देशी टेस्ला’ दाखवली आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी इलॉन मस्क यांना टॅग करत ट्विट केलं आहे.
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांना टॅग केले आहे. आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये ‘Back to the future’ असे लिहिले आहे. आनंद महिंद्राच्या या छायाचित्रात बैलगाडीवर झोपलेले दोन लोक शेतातून घरी परतताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिलं आहे की, नेव्हिगेशनसाठी गुगल मॅपचीही गरज नाही. कोणत्याही प्रकारच्या इंधनाची गरज नाही. त्यामुळे प्रदूषण होत नाही. पूर्णपणे सुरक्षित मोडवर चालते. काम संपल्यानंतर घरी जाण्यासाठी सेट केल्यावर, तुम्ही विश्रांतीसोबत डुलकी घेऊ शकता आणि ते तुम्हाला तुमच्या योग्य ठिकाणी घेऊन जाईल.
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी भारतीय बैलगाडीची तुलना टेस्लाशी केली आहे. सध्या इलॉन मस्क यांनी आनंद महिंद्रा यांच्या पोस्टवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. असं असलं तरी मोठ्या संख्येने नेटकरी ही पोस्ट शेअर करत आहेत. तसेच त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.