महिंद्रा उद्योग समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा हे त्यांच्या ट्वीट्समुळे कायम चर्चेत असतात. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, ऑटोमोबाईल अशा सर्वच विषयांवर त्यांनी केलेले हटके ट्वीट बरेच व्हायरल झाले आहेत. असंच त्यांचं एक ट्वीट सध्या व्हायरल होत असून यात त्यांनी टेस्ला कंपनीचा मालक आणि सध्याचा जगातला सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क याला तीन वर्षांपूर्वी निराशेत असताना धीर दिल्याचं म्हटलं आहे. यासाठी त्यांनी तीन वर्षांपूर्वी एलन मस्कच्या एका मुलाखतीवर केलेलं ट्वीट रीट्वीट केलं आहे. तसेच ट्वीटच्या शेवटी, या सगळ्यातून कधीही हार न मानण्याचा धडा आपल्याला मिळतो, असं ते म्हणाले आहेत.
एलन मस्कनं नुकताच जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती होण्याचा मान मिळवला आहे. सध्या एलन मस्कची वैयक्तिक मालमत्ता ही ३०० बिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी प्रचंड झाली आहे. टेस्ला कंपनीकडे नुकतीच १ लाख इलेक्ट्रिकल गाड्यांसाठीची ऑर्डर आली असून त्यामुळे त्याच्या संपत्तीत आणि टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र, आज ३०० बिलियन डॉलर्सचा मालक असलेला एलन मस्क कधीकाळी निराश झाला होता असं म्हटलं तर कुणाला विश्वास बसणार नाही. मात्र, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीच याबाबतचा खुलासा केला असून त्यावेळी आपण त्याला धीर देणारं ट्वीट केल्याचं आनंद महिंद्रा म्हणाले आहेत.
जर जगाची भूक माझ्या संपत्तीनं भागणार असेल तर मी टेस्ला विकायला तयार; एलन मस्क
“कधीही हार मानू नका”
आनंद महिंद्रांनी बुधवारी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. त्यांनी स्वत:चच तीन वर्षांपूर्वी १८ ऑगस्ट २०१८ रोजी केलेलं ट्वीट पुन्हा शेअर केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये आनंद महिंद्रा म्हणतात, “आता विश्वास बसत नाहीये की फक्त तीन वर्षांपूर्वी मला एलन मस्कला धीर देणारा संदेश पाठवावा लागला होता. तेव्हा तो पूर्णपणे थकला होता आणि वाईट काहीतरी घडेल असं त्याला वाटत होतं. आता तो ३०० बिलियन अमेरिकन डॉलर्सचा मालक आहे. आजपर्यंतच्या इतिहासातला सर्वात श्रीमंत आणि यशस्वी उद्योगपती. यातून आपण कोणता धडा घेतला? कधीही हार मानू नका, स्वत:वर विश्वास ठेवा”!
काय होतं तीन वर्षांपूर्वीच्या ट्वीटमध्ये?
आनंद महिंद्रांनी तीन वर्षांपूर्वी एलन मस्कला टॅग करून केलेलं ट्वीट रीट्वीट केलं आहे. यात त्यांनी एलन मस्कला धीर दिल्याचं दिसत आहे. १८ ऑगस्ट २०१८ रोजी हे ट्वीट त्यांनी केलं होतं. यात ते म्हणतात, “धीर धर एलन मस्क, तुझी कंपनी आत्ता कुठे वेग धरू पाहात आहे. जगाला तुझ्यासारख्या प्रेरणादायी कल्पक लोकांची गरज आहे.”
आनंद महिंद्रांनी आपल्या या ट्वीटसोबत न्यूयॉर्क टाईम्सला एलन मस्कने दिलेल्या मुलाखतीची लिंक शेअर केली आहे. यामध्ये एलन मस्क २०१८ वर्ष कसं थकवणारं आणि त्रासदायक गेल्याचं सांगत आहे. त्यावरच आनंद महिंद्रांनी त्याला धीर देणारं ट्वीट केलं होतं.