महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टीव्ह असतात. कधी एखादे विनोदी ट्विट करत तर कधी कोणाला प्रोत्साहन देत ते सोशल मीडियावरील आपले अस्तित्व दाखवून देतात. नुकताच त्यांनी एक छानसा व्हिडियो ट्विट केला होता. त्यामध्ये सफरचंदावर आणि झाडाच्या पानावर व्यक्तींचे चेहरे अतिशय सुबक पद्धतीने कोरणारी व्यक्ती दिसत आहे. त्यावर ते लिहीतात, माझा चीनमधील एक मित्र मला बऱ्याचदा काही व्हिडियो पाठवतो. त्यातील कला ही अविश्वसनीय आहे. हे आताच्या काळातील असावे अशी आशा आहे, ज्यामुळे या शिल्पकलेबाबची निश्चिती होईल. त्यांनी हा व्हिडियो शेअर केल्यानंतर एका तरुणाने त्यांना कमेंटमध्ये आपल्या कलेचा एक व्हिडियो शेअर केला आहे.

सचिन सांघे असे या व्यक्तीचे नाव असून त्यांनी आपण खडूवर केलेल्या एका अतिशय उत्तम अशा कलेचा व्हिडियो टाकला आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांनी बहीण आणि भावाची कोरलेली कलाकृती निर्माण केली आहे. विशेष म्हणजे हा व्हिडियो महिंद्रा यांनी रिट्विट केला आहे. त्यावर त्यांनी हे अतिशय सुंदर आहे असे म्हणत सचिन यांना तुमची वेबसाइट आहे का असे विचारले आहे. महिंद्रांचे सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणे सर्वांना माहित असल्याने त्यांना लोक आपल्या ट्विटमध्ये टॅग करतात. त्याप्रमाणे त्यांच्या ट्विटवर मोठ्या प्रमाणात कमेंटसही आल्या आहेत. त्यामुळे आपल्या ट्विटद्वारे महिंद्रा कलेलाआणि कलाकाराला प्रोत्साहन देत असल्याचे दिसते.