जग खूप छोटं आहे हे वाक्य आपण सर्वांनीच कधी ना कधी ऐकले असेल. याच वाक्याला साजेसा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीचे सर्वोसर्वा आनंद महिंद्रांनी ट्विटवर शेअर केला आहे. अवघ्या काही तासांमध्ये या व्हिडीओला २५ हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

आनंद महिंद्रा ट्विटवर खूपच अॅक्टीव्ह असून नेहमीच ते वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या अशाच एका व्हिडीओमध्ये ग्रह, ताऱ्यांशी तुलना करता आपण या विश्वाच्या पसाऱ्यात किती लहान आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे ट्विट करताना महिंद्रा म्हणतात, ‘हा व्हिडीओ अगदी शेवटपर्यंत पहा तरच त्यामध्ये देण्यात आलेला तुलनात्मक आकारामानासंदर्भातील संदेश तुम्हाला समजेल. आणि जर तुम्ही तो व्हिडीओ संपूर्ण पाहिलात तर तुमच्या डोक्यातही मला सुचलेलाच विचार येईल. तो विचार म्हणजे, जेव्हा तुम्ही काहीतरी साध्य करण्याचा प्रयत्न करता तेव्हा त्या प्रयत्नांमागील उद्देश मोठा आणि व्यापक हवा. तसे नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही. कारण आपण या विश्वामधील खूपच लहानसा भाग आहोत.’

जे काही करत असाल त्यामागे मोठा आणि व्यापक उद्देश असू द्या. कारण उद्देशावरच सर्व अवलंबून असतं. ते नसेल तर तुमच्या कार्याला अर्थ नाही. कारण आपण या विश्वाचा खूप छोटा घटक आहोत असाच संदेश महिंद्रांनी नेटकऱ्यांना दिला आहे.

नेहमीप्रमाणे अनेकांनी या ट्विटला उत्तर दिले आहे. महिद्रांचे हे मत पटल्याचे ट्विटला दिलेल्या रिप्लायमध्ये म्हटले आहे. त्यापैकी महिंद्रांनी एक रिप्लाय रिट्विट केला आहे. ज्यामध्ये हा व्हिडीओ म्हणजे, ‘तुला माहितं नाही मी कोण आहे किंवा तुला ठाऊक नाही माझा बाप कोण आहे’ असं म्हणणाऱ्यांसाठी योग्य उत्तर असल्याचे म्हटले आहे.

महिंद्रांच्या या ट्विटखाली नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत.