मिशन चांद्रयान-३ च्या यशामुळे इस्रोच्या शास्त्रज्ञांचं जगभरातून कौतुक होत आहे. या मोहिमेमुळे भारताला आता अनेक आशा आहेत. या मोहिमेमुळे प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली आहे. भारताच्या या कामगिरीने संपूर्ण मानवतेला एक विशेष संदेश दिला आहे. चांद्रयान-३ च्या यशाने प्रेरित होऊन लोक चंद्रावर राहण्याचे स्वप्न पाहत आहेत. अशा परिस्थितीत आपल्या देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा मागे कसे राहतील. सध्या त्यांचे एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये त्यांच्या कंपनीची कार चंद्रावर उतरत असल्याचे दाखवण्यात आले आहे. यामुळे आनंद महिंद्रा यांचे हे ट्विट आता चर्चेचा विषय ठरत आहे.
चांद्रयानमधून एक कार चंद्राच्या पृष्ठभागावर कशी उतरत आहे हे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पण, हा एक ॲनिमेटेड व्हिडीओ आहे, असे महिंद्र अँड महिंद्राच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
जर चंद्रावर सर्व काही सुरळीत असल्याची माहिती मिळाली, तर आगामी काळात चंद्रावर राहणे अवघड नसेल, असे या व्हिडीओच्या माध्यमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आनंद महिंद्राही आपल्या तयारीत व्यस्त आहेत. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, चंद्राच्या पृष्ठभागावर एक चांद्रयान- ३ च्या लँडरप्रमाणे एक लँडर उभा आहे ज्याचे दरवाजे हळू हळू ओपन होतात. ज्यानंतर आतून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची नवीन थार-ई खाली उतरते आणि चंद्राच्या पृष्ठभागावर पुढे सरकते.
हे ट्विट शेअर करताना आनंद महिंद्रा म्हणाले की, आमच्या महत्त्वाकांक्षेला उड्डाण दिल्याबद्दल चांद्रयान-३ च्या यशाबद्दल इस्रोचे मनापासून आभारी. भविष्यात लवकरचं विक्रम आणि प्रज्ञान लँडर्ससह थार ई चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना आपण पाहू… त्यांची ही खास स्वप्नांशी संबंधित पोस्ट आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.