प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. जेव्हा ते इंटरनेटवर काहीतरी वेगळं पाहतात तेव्हा ते बऱ्याचदा प्रभावित होतात नेहमीच अशा गोष्टींचे कौतुक करतात. त्याचप्रमाणे आनंद महिंद्रा यांनी अहमदनगर शहरातील दरबार फॅब्रिकेशनचे समीर बागवान, आसिफ पठाण आणि एजाज खान यांनी बनवलेल्या फोल्डिंग पायऱ्यांचे कौतुक केले आहे. महिंद्रा यांनी या शिडीचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्टही केला आहे.
अहमदनगर शहरात जुन्या महानगरपालिकेसमोरील राज एंटरप्रायझेस दुकानाशेजारी असलेल्या अरुंद गल्लीत जागेअभावी जिना बांधणे अवघड झाले होते. त्याचवेळी शहरातील पाचपीर चावडी येथील दरबार फॅब्रिकेशनच्या समीर बागवान या तरुणाला फोल्डिंग शिडी बनवण्याची कल्पना सुचली. समीर नेहमी फेसबुकवर असे जुगाडू व्हिडीओ पाहत असतो. आपण अशा पायऱ्या बनवू शकतो ही कल्पना त्याने आपल्या इतर सोबत्यांना सांगितली. तो प्रयोग यशस्वी होईल की नाही याची खात्री त्यांना नव्हती. प्रयोगाचा खर्च वाया जाऊ शकतो हे माहित असूनही त्यांनी ही फोल्डिंग शिडी तयार करण्याचे ठरवले.
हा तरुण लोकांना मिठी मारून तासाला कमावतो ७ हजार रुपये! जाणून घ्या काय आहे प्रकरण
या शिडीच्या प्रत्येक पायरीवर एक बिजागर बसवले आहे. तर, या पायऱ्या दुमडल्या जाऊ शकतात आणि बाजूच्या भिंतीवर लॉक केल्या जाऊ शकतात. त्यामुळे शिडी वापरायची असेल तेव्हाच शिडी काढता येते आणि इतर वेळी ती भिंतीला चिटकवून ठेवता येते. त्यामुळे या रस्त्यावरील जागा ये-जा करण्यासाठी उपयोगी पडते. ही शिडी बनवण्यासाठी त्यांनी प्रत्येक पायरीसाठी १५०० रुपये खर्च केले आहेत. या शिडीमध्ये एकूण १२ पायर्या असून इतर साहित्याचा खर्च लक्षात घेऊन या शिडीसाठी एकूण २० हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत.
ही शिडी बनवल्यानंतर समीर बागवानने त्याच्या फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट केला, जो आनंद महिंद्रा यांनी पाहिला. अशा जुगाडाने महिंद्र नेहमीच प्रभावित होतात. त्यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट करून समीरच्या कामाचे कौतुक केले. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर आतापर्यंत नऊ लाख ८५ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, तर पाच हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे.
MDH मसाल्यांना मिळाला नवा चेहरा; जाणून घ्या जाहिरातीत दिसणारी ही व्यक्ती आहे तरी कोण
आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ आपल्या अकाउंटवर पोस्ट केल्यानंतर दरबार फॅब्रिकेशनचे समीर बागवान म्हणाले की, आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या कामाचे थेट कौतुक केल्याने त्यांना आणखी चांगले काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. यासोबतच त्यांनी महिंद्राचे आभार मानले आहेत. ते पुढे म्हणाले की, महिंद्रा यांनी व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर आम्हाला नातेवाईक आणि मित्रांकडून फोन येत आहेत आणि अनेकांनी आमचे अभिनंदन केले आहे आणि कौतुक केले आहे.