भारतीय वाहन क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांपैकी एक असणाऱ्या ‘महिंद्रा अॅण्ड महिंद्रा’ने जगातील सर्वात वेगवान कार जिनेव्हा येथील मोटार शोमध्ये नुकतीच लॉन्च केली. महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या मालकीच्या ‘ऑटोमोबाइली पिनिनफेरिना’ या इटालियन कंपनीने ‘बटिस्टा’ नावाची लक्झरी इलेक्ट्रिक सुपर कार तयार केली आहे. जिनेव्हा येथे सुरु असलेल्या ‘जिनेव्हा मोटर शो २०१९’ मध्ये या कारची पहिली झलक पहायला मिळाली. ‘महिंद्रा अॅण्ड महिंद्रा’चे अध्यक्ष आनंद महिद्रांनी या गाडीच्या लॉन्चिंग सोहळ्याचे काही फोटो आणि व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊण्टवरुन शेअर केले. मात्र यापैकी एक ट्विटवर त्यांना एका युझरने ‘कितना देती है?’ असा प्रश्न विचारला. या प्रश्नाच्या ट्विटला कोट करत आनंद महिंद्रांनी मजेशीर उत्तर दिले आहे. आनंद महिंद्रांचे हे ट्विट सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरले आहे.

जगातील सर्वात शक्तीशाली कार म्हणून ‘बटिस्टा’कडे पाहिले जात आहे. ‘महिंद्रा अॅण्ड महिंद्रा’च्या मालिकच्या जर्मनीमध्ये मुख्यालय असणाऱ्या ‘ऑटोमोबाइली पिनिनफेरिना’ या इटालियन कंपनीने बनवलेली ही कार अवघ्या २ सेकंदामध्ये १०० किलोमीटर प्रती तास एवढा वेग पकडू शकते. हा वेग कोणत्याही फॉर्म्युला वन कारच्या वेगापेक्षा अनेक पटींने जास्त आहे. या गाडीचे फिचर्स आनंद महिंद्रांनी ट्विटवरुन काही ट्विट करत शेअर केले.

गाडीची पहिली झलक

गाडीचे फिचर्स

गाडी लॉन्च केले त्या सोहळ्यातील फोटो

गाडीचे लूक्स

असे काही ट्विट आनंद महिंद्रांनी आपल्या ट्विटर अकाऊण्टवरुन या कारची माहिती देताना केला. या पैकी गाडीचे लूक्स दाखवणाऱ्या ट्विटला महिंद्रांच्या एका फॉलोअरने रिप्लाय करुन ‘कितना देती है?’ असा प्रश्न विचारला.

एका लोकप्रिय जाहिरातीमध्ये हा प्रश्न गाडी किती मायलेज देते यासंदर्भात वापरण्यात आला आहे. भारतीय लोक गाडी विकत घेताना मायलेजचा विचार करतात अशा आशयाची ही जाहिरात होती. याच जाहिरातीमधील हा प्रश्न भारतीयांमध्ये खूपच लोकप्रिय झाला आहे. हाच प्रश्न वापरुन युझरने महिंद्राची जगातील सर्वात वेगवान लक्झरी इलेक्ट्रिक सुपर कार किती मायलेज देते असा प्रश्न आनंद महिंद्रांना विचारला. यावर आनंद महिंद्रांनी या युझरला उत्तर देताना, ‘सरजी, इलेक्ट्रिक कार आहे ही शॉक देते’ असे ट्विट केले आहे.

महिंद्राची ‘बटिस्टा’ ही कार पेट्रोल किंवा डिझेलवर चालणारी नसून ती पूर्णपणे इलेक्ट्रिक कार आहे. वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या ‘ऑटोमोबाइली पिनिनफेरिना’ कंपनीची ही पहिलीच कार आहे. ‘पिनिनफेरिना एसपीए’ या ८९ वर्ष जुन्या कंपनीच्या मालिकीची असणारी ‘ऑटोमोबाइली पिनिनफेरिना’ कंपनी भविष्यातही केवळ इलेट्रीक गाड्या बनवणार आहे. ‘बटिस्टा’ ही गाडी २०२० साली ‘पिनिनफेरिना एसपीए’च्या नव्वदाव्या स्थापनादिनी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या गाडीला एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ती ४५० किलोमीटरपर्यंत जाऊ शकते असा दावा कंपनीने केला आहे. साध्या पद्धतीने चार्ज होणारी आणि फास्ट चार्जिंग होणारी अशा दोन प्रकारांमध्ये ही गाडी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

फिचर्स आणि किंमत

कार्बन फायबर मोनोक्रॉक चॅसीस आणि कार्बन फायबर पासून बनवलेली ही गाडी १२० केडब्लूएच क्षमतेच्या लिथियम आयन बॅटरीवर चालेल. या गाडीच्या प्रत्येक चाकासाठी वेगळी मोटर असून सर्व मोटर्स थेट बॅटरीला कनेक्ट असतील. गाडी थंड करण्यासाठी पाच रिडिएटर असणारी कुलिंग सिस्टीमही गाडीत बसवण्यात आली आहे. या गाडीचा सर्वाधिक वेग ३५० किलोमीटर प्रती तास इतका आहे. कंपनी केवळ १५० बटिस्टा गाड्या बनवणार असून त्या उत्तर अमेरिका, युरोप आणि मध्य आशियामध्ये विक्रीसाठी उपलब्ध केल्या जातील. या गाडीची अंदाजे किंमत २२ लाखांहून अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Story img Loader