Most Viral Video of 2024:  वर्ष २०२४ संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या सरत्या वर्षात अनेक अविस्मरणीय घटना घडल्या, ज्याचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले. २०२४ वर्षाची सुरुवात अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनाने झाली. त्याचवेळी देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्यापासून बिहारच्या ब्लॉगर राजाच्या लग्नाच्या विधीपर्यंतच्या घटना यावर्षी खूप ट्रेंडमध्ये होत्या. इतकंच नाही तर पॅरिस ऑलम्पिक आणि आयसीसी टी-२० क्रिकेटचषक या क्रीडाविषयक घडामोडींनीदेखील सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं. याशिवाय नॅन्सी त्यागीचा कान्स २०२४ मधील लूक आणि बिग बॉस ओटीटी सीझन ३ ची वडापाव गर्लदेखील यावर्षी प्रसिद्धी झोतात आली. चला तर मग, या खास क्षणांवर एक नजर टाकूया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानींचा विवाह २०२४ या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या शाही विवाह सोहळ्यांपैकी एक होता. या विवाह सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक सुप्रसिद्ध सेलिब्रिटी, सिंगर, राजकारणी, उद्योजक, साधू-महंतांनी हजेरी लावली होती. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर महिनाभर अनंत राधिका विवाह सोहळा एक ट्रेंडिंगचा विषय होता.

ICC T-20 विश्वचषक क्रिकेट

विश्वचषक क्रिकेटमधील भारताच्या विजयाने देशवासीयांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला. एवढेच नाही तर सोशल मीडियावरही या विजयाचा मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. खरंतर, ICC T-20 विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले होते. यासह भारताने दुसरे टी-२० विश्वचषक जिंकले. याआधी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला T-20 विश्वचषक जिंकला होता. आयसीसी टी-२० विश्वचषक क्रिकेटमधील भारताच्या विजयाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. मुंबईतील टीम इंडियाची व्हिक्ट्री परेडदेखील सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.

अयोध्या राम मंदिर उद्घाटन दिवस

अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन देशवासीयांसाठी एक ऐतिहासिक क्षण होता. या कार्यक्रमाबाबत देशासह परदेशातही चर्चा रंगली. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले. २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन केले. भारताच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा प्रसंग होता. उद्घाटनामध्ये रामलल्लाच्या मूर्तीच्या ‘प्राणप्रतिष्ठा’ (स्थापना) समारंभाचा समावेश होता. सात हजारांहून अधिक मान्यवरांची उपस्थिती पार पडलेला हा कार्यक्रम केवळ धार्मिक सोहळाच नाही, तर भारतासाठी एक सांस्कृतिक मैलाचा दगडही होता.

ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंचा विजय

भारताने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये एक रौप्य आणि पाच कांस्यपदकांसह सहा पदके जिंकली. मनू भाकरने पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकले. ऑलिम्पिक नेमबाजीत भारतासाठी कांस्यपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. या विजयामुळे देशवासीयांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली आणि सोशल मीडियावर खूप जल्लोष झाला.

नॅन्सी त्यागीचा कान्स २०२४ मधील लूक

फॅशन इन्फ्ल्यूएंसर नॅन्सी त्यागी ही देखील २०२४ मधील चर्चेतील चेहरा ठरली. एक सामान्य तरुणी असलेल्या नॅन्सीला कान्स २०२४ च्या रेड कारपेटवर स्वत:ची फॅशन स्टाईल दाखवण्याची संधी मिळाली. नॅन्सीने कान्स २०२४ मध्ये बेबी पिंक रंगाचा फ्रिल गाऊन स्टाईल केला होता. अगदी सिंपल क्लासी असणाऱ्या त्या गाऊनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. पण, तिचा तो भारी गाऊन कोणत्याही डिझायनर ब्रँडने डिझाइन केला नव्हता, तर नॅन्सीने स्वतः डिझाइन आणि कस्टमाइज केला होता, त्यामुळे तिचा तो लूक सर्वांसाठीच खास गोष्ट होती. तो गाऊन बनवण्यासाठी तिला ३० दिवसांपेक्षा जास्त वेळ लागला. तसेच तो तयार करण्यासाठी १००० मीटरपेक्षा जास्त कापड वापरण्यात आले आहे. नॅन्सीने स्वतः हा संपूर्ण लूक कस्टमाईज केला आहे.

बिग बॉस ओटीटी सीझन ३ मधील ‘वडापाव गर्ल’

वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षित बिग बॉस ओटीटी सीझन ३ ची स्पर्धक होती. चंद्रिका दीक्षित मूळची दिल्लीची आणि ‘वडापाव गर्ल’ म्हणून ओळखली जाते. नोकरी सोडून तिने दिल्लीत वडापावचा स्टॉल लावला. चंद्रिका दीक्षित ही बिग बॉस ओटीटी सीझन ३ ची पहिली कन्फर्म कंटेन्स्टंट होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant ambani wedding ram mandir nancy tyagi cans look big boss vada pav girl to most viral moments of 2024 in social media sjr