Anant chaturdashi 2024: गणेशोत्सव सुरू होण्याचा उत्साह ते गणेशोत्सव संपण्याचे दुःख या सर्व भावनांमधून सध्या अनेक जण जात आहेत. बघता बघता गणोशोत्सव संपत आला. आज गणेशोत्सवाचा दहावा दिवस असून यंदा दहा दिवसांच्या गणपतीचे अकराव्या दिवशी विसर्जन होईल. सध्या सोशल मीडियावर गणेशोत्सवादरम्यानचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. ज्यात बाप्पाच्या आगमनाचे, मूर्तीचे, डेकोरेशनचे विविध व्हिडीओ यांसह मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये भाविकांबरोबर करण्यात आलेली वाईट वागणूक सध्या खूप चर्चेत आहेत. याचदरम्यान मनाला भावूक करणारे काही व्हिडीओदेखील समोर आले आहेत, ज्यात एक चिमुकली बाप्पाचे विसर्जन पाहून भावूक झाली आहे.
लहान मुलांचे मन खूप निरागस असते. गणपती बाप्पा हा अनेक लहान मुलांचा आवडता देव आहे. बाप्पाच्या येण्याने घरातील मोठ्यांइतकाच आनंद आणि उत्साह घरातील चिमुकल्यांमध्येही दिसून येतो. तसेच बाप्पा जाणार हे कळल्यावर तीच लहान मुलं सगळं घर डोक्यावर घेतात. आता असाच एक व्हिडीओ पाहायला मिळत आहे, ज्यात एका बाप्पाला निरोप देताना चिमुकल्या रडत आहेत.
या व्हायरल व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता, बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर एक चिमुकली मोठमोठ्याने रडताना दिसत आहे, यावेळी तिचे आई-वडील तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, तरीही ती बाप्पाचे विसर्जन केलेल्या पाण्याकडे हात दाखवून रडताना दिसत आहे. या व्हिडीओमधील पुढच्या क्लिपमध्ये आणखी काही व्हिडीओ पाहायला मिळत आहेत; त्यामध्येदेखील चिमुकल्या बाप्पाच्या मूर्तीला घट्ट पकडून रडताना दिसत आहेत. या चिमुकल्यांचा हा मनाला भावूक करणारा व्हिडीओ पाहून नेटकरीही दुःख व्यक्त करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @old_city_festivals_2024 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत चार लाखांहून अधिक व्ह्यूज आणि ४० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “माझा लहान मुलगाही असाच रडत होता.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “हे खरे भाव आहेत.” तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या”, तर चौथ्या युजरने लिहिलंय की, “लहान मुलं खरंच खूप गोड असतात.”