Anant Radhika Wedding Best wishes from MS Dhoni and Sakshi : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी आणि एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेन मर्चंट यांची कन्या राधिका मर्चंट हे नुकतेच विवाहबंधनात अडकले आहे. १२ जुलैला मुबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये अनंत- आणि राधिका यांचा मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. हिंदू परंपरेनुसार दोघांची लग्नगाठ बांधली गेली. सध्या अनंत-राधिकाच्या शाही लग्नसोहळ्याच्या फोटो व व्हिडीओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
या लग्नाला आणि त्यानंतरच्या शुभाशीर्वादाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत देशभरातील अनेक दिग्गज नेते, क्रिकेटपटू, बॉलिवडू कलाकार, उद्योगपती आणि हॉलिवूडमधील सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सपत्निक या लग्नसोहळ्याला उपस्थित होता. विवाह पार पडल्यानंतर धोनी आणि साक्षीने अनंत व राधिकाची भेट घेऊन दोघांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राधिकाने धोनीला मिठी मारली. तर धोनीनेही थोरल्या भावाप्रमाणे तिला आशीर्वाद दिला. तसेच अनंत अंबानी यांना राधिकाची कशी काळजी घ्यायची याबाबत सल्ला दिला.
धोनीने अनंत व राधिकाबरोबरचा एक फोटो समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. या फोटोसह कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, “राधिका, तुझ्या चेहऱ्यावरील तेजस्वी हसू सदैव असंच राहू देत! अनंत, तू तुझ्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येकाला प्रेमाने वागवतोस. तितक्याच प्रेमाने आणि काळजीने राधिकाचा सांभाळ कर, तिची काळजी घे. तुमचं वैवाहिक जीवन आनंदाने, हास्याने आणि साहसाने भरलेलं असावं. अभिनंदन आणि लवकरच भेटू!”
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यापासून तो माध्यमांसमोर येणं टाळतो. तसेच तो समाजमाध्यमांवरही सक्रीय नसतो. त्याच्याकडे फोनही नाही. मात्र अनंत-राधिकासाठी धोनीने समाजमाध्यमांवर सक्रीय होत एक पोस्ट लिहिली आहे.
हे ही वाचा >> Anant Ambani Wedding Cost : अनंत अंबानीच्या शाही लग्नात ५००० कोटींचा खर्च, मुकेश अंबानींची संपत्तीवर किती फरक पडणार?
अशी आहे अनंत-राधिकाची प्रेमकहाणी
अनंत आणि राधिका लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. दोघांचीही लहानपणापासूनच चांगली मैत्री होती. याच मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. पण त्यानंतर दोघांनी लगेच आपल्या नात्याचा खुलासा केला नाही. दोघांनीही आपल्या करीअरवर अधिक लक्ष दिलं. २०१८ मध्ये पहिल्यांदाच अनंत-राधिकाचा रोमँटिक फोटो समोर आला होता. त्यानंतर दोघं अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसू लागले. २०२०मध्ये करोना काळात अनंत व राधिका गुजरातच्या जामनगर येथे अडकले होते. त्यावेळी राधिकाने अनंतवरील प्रेमाचा खुलासा केला होता. अनंतनेही आपल्या प्रेमाची अनेकदा कबुली दिली आहे. विशेष बाब म्हणजे अनंतच्या आजारपणात राधिकाने नेहमी त्याची साथ दिली. त्यामुळे अनंत पत्नी राधिकाला त्याची ताकद मानतो आणि स्वतः नशीबवान असल्याचं सांगतो.