‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ असं म्हणत चार दशकं मराठी लोकांना मुंबई दूरदर्शन केंद्रावरून म्हणजेच आत्ताच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून बातम्या ऐकवणारे जेष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं आज निधन झालं. ते ६५ वर्षांचे होते. १९७४ ते अगदी २०१६ पर्यंत त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केलं. आपल्या आवाजाच्या जोरावर ‘प्रदीप भिडे कम्युनिकेशन’ या नावाने ध्वनिमुद्रण स्टुडिओ, निर्मिती संस्था सुरु केली. पाच हजारांहून अधिक जाहिराती, माहितीपट, लघुपटांमधून आवाज देणाऱ्या प्रदीप भिडे यांनी ‘लोकसत्ता’ला २०१७ साली ‘पुनर्भेट’ या सदराअंतर्गत दिलेल्या मुलाखतीमध्ये पुनर्जन्माबद्दल भाष्य केलं होतं. आपल्या आवाजाच्या जादूने मराठी जनतेला ‘बातम्या’ ऐकण्याचा छंद लावणाऱ्या प्रदीप भिडे यांनी पुढील जन्माबद्दल बोलताना एक कौशल्य शिकण्यासंदर्भातील इच्छा व्यक्त केलेली.
नक्की वाचा >> वृत्तनिवेदनातील मानबिंदू हरपला! प्रदीप भिडेंच्या निधनाने राजकारणीही हळहळले; सुप्रिया सुळे ते विनोद तावडे… पाहा कोण काय म्हणाले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
घराघरातील आवाज
ऑल इंडिया रेडिओ पुणे तसेच सह्याद्री बातम्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन भिडे यांच्या निधनासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काही वर्षे नोकरी करून त्या काळात ती सोडण्याचे धाडस दाखवलेले, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या नाटय़संस्थेतून काही काळ नाटकांशी जोडले गेलेले आणि हजारो जाहिराती, माहितीपट-लघुपट यांचा ‘आवाज’ असलेले ज्येष्ठ वृत्तनिवेदक-सूत्रसंचालक प्रदीप भिडे हे दूरदर्शनमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले.
विज्ञान शाखेची पदवी घेऊन ‘रानडे’मधून पत्रकारितेचा अभ्यास
प्रदीप भिडे यांचे आई आणि वडील शुभलक्ष्मी व जगन्नाथ हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून काम करत होते. विविध ठिकाणच्या शाळांमध्ये बदली होत असल्याने प्रदीप यांचे शिक्षण महाराष्ट्रातील पाच ते सहा खेडेगावांतून झाले. अकरावी एसएससी झाल्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आले. विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी ‘रानडे’मधून पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. भाषेचे संस्कार लहानपणापासूनच घरातून झाले होते. आई व वडील दोघेही संस्कृत, मराठी व हिंदी भाषेचे शिक्षक असल्याने अभ्यास, क्रमिक पाठय़ पुस्तकांबरोबरच अन्य अभ्यासेतर पुस्तकांचे वाचन होतेच. पण भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय दररोज मोठय़ा आवाजात म्हटलाच पाहिजे, असा घरातील दंडक होता. ‘विष्णुसहस्रनाम’ही म्हटले जायचे. त्यामुळे शुद्ध व स्पष्ट शब्दोच्चार व्हायला आणि ‘आवाज’ घडायला त्याची त्यांना मोलाची मदत झाली.
अशी मिळाली नोकरीची संधी
२०१७ साली लोकसत्ताला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रदीप भिडे यांनी, मुंबई दूरदर्शन केंद्रावर ‘वृत्तनिवेदक’ म्हणून झालेल्या प्रवेशाच्या आठवणींचा पट उलगडा होता. त्यावेळी त्यांनी, “आकाशवाणी किंवा दूरदर्शनकडे माझा ओढा होताच. तिथे आपण काम करावे असे वाटत होते. ‘रानडे’मध्ये पत्रकारितेचा अभ्यासक्रम करत असताना मुंबई दूरदर्शन केंद्रावर उपसंचालक असलेले ल. गो. भागवत हे आम्हाला ‘दूरदर्शन’ हा विषय शिकवायला यायचे. आमच्यापैकी कोणाला दूरदर्शन केंद्रावर काम करायची इच्छा असेल तर त्यांनी जरूर येऊन भेटावे, असे सांगितले होते. त्यानुसार मी भागवत यांना भेटलो. दूरदर्शनवर माझी सुरुवात ‘प्रशिक्षणार्थी निर्मिती साहाय्यक’ म्हणून झाली. हे काम करत असतानाच्या काळात मुंबई दूरदर्शन केंद्राचे तेव्हाचे संचालक शास्त्री यांनी माझा आवाज ऐकून तू बातम्या का वाचत नाही? अशी विचारणा केली. माझ्यासाठी ती संधी होती. ‘वृत्तनिवेदक’ पदासाठी रीतसर ‘ऑडिशन’ दिली आणि या पदासाठी माझी निवड झाली. मुंबई दूरदर्शन केंद्र १९७२ मध्ये सुरू झाले आणि १९७४ च्या डिसेंबर महिन्यात मी वृत्तनिवेदक म्हणून माझे पहिले बातमीपपत्र वाचले. गोविंद गुंठे हे तेव्हा बातम्यांचे निर्माते होते. पहिले बातमीपत्र जेव्हा वाचले तेव्हा सुरुवातीला मला अक्षरश: घाम फुटला होता. आपण बातम्या नीट वाचू की नाही अशीही मनात भीती वाटत होती. पण सुरुवातीच्या काही मिनिटांनतर दडपण दूर झाले आणि मी बातमीपत्र सादर केले. आता नेमक्या कोणत्या बातम्या वाचल्या ते आठवत नाही. पण पहिलेच बातमीपत्र छान आणि व्यवस्थित सादर झाले, अशी पावती मला मिळाली,” असं म्हटलं होतं.
आवाजाच्या जोरावर सुरु केला स्टुडिओ…
भिडे यांना नाटकाचीही पार्श्वभूमी होती. नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या संस्थेत त्यांनी काही काळ प्रायोगिक नाटकांतून काम केले. दिलीप प्रभावळकर, वसंत सोमण, रवी पटवर्धन हे त्यांचे सहकलाकार. नाटकातून काम केलेले असल्याने ‘स्टेज फीअर’ म्हणून जे काही असते त्याची भीती, दडपण त्यांच्यावर नव्हते. नाटकाच्या या पाश्र्वभूमीचा दूरदर्शनवर बातम्या वाचण्यासाठी मोठा फायदा झाल्याचे भिडे सांगायचे. ‘ई-मर्क’ आणि ‘हिंदूस्थान लिव्हर’ या बहुराष्ट्रीय कंपन्यांत त्यांनी ‘जनसंपर्क अधिकारी’ म्हणून काही काळ नोकरीही केली. त्या कामातील साचेबद्धपणाचा कंटाळा आल्याने आणि स्वत:च्या ‘आवाजा’वर आर्थिक प्राप्ती करता येईल याचा आत्मविश्वास असल्याने त्यांनी त्या काळात नोकरी सोडण्याचे धाडस केले. पत्नी सुजाता यांनीही भिडे यांच्या नोकरी सोडण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला. मुंबईत खार येथे भिडे यांचे सासरे सुभाष कोठारे यांची स्वत:ची एक इमारत होती. तिथे त्यांनी ‘प्रदीप भिडे कम्युनिकेशन’ या नावाने ध्वनिमुद्रण स्टुडिओ, निर्मिती संस्था सुरू केली. पुढे त्यांनी या क्षेत्रात जम बसविला आणि स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करून जाहिराती, माहितीपट-लघुपट यावर आपला ‘आवाज’ ठसविला.
पाच हजारहून अधिक जाहिराती, माहितीपटांना आवाज ते दीड ते दोन हजार कार्यक्रमांचं निवेदन
भिडे यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये पाच हजारांहून अधिक जाहिराती, माहितीपट, लघुपट यांना ‘आवाज’ दिला असून सुमारे दीड ते दोन हजार कार्यक्रमांचे सूत्रसंचालन/निवेदन केले. ‘पुणे फेस्टिव्हल’च्या पहिल्या वर्षांपासून सलग सात-आठ वर्षे त्यांनीच सूत्रसंचालन केले. ‘पुणे फेस्टिव्हल’चा ‘उत्कृष्ट निवेदक’ हा पुरस्कारही त्यांना मिळाला. शिवसेना-भाजप युतीच्या मंत्रिमंडळाचा १९९५ मध्ये शिवाजी पार्कवर झालेला शपथविधी सोहळा, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी, राष्ट्रपती व पंतप्रधान यांचेही काही जाहीर कार्यक्रम आणि अशा अनेक महत्त्वाच्या राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन भिडे यांनी केले.
अमिन सयानी यांना गुरुस्थानी मानायचे
वृत्तनिवेदन व सूत्रसंचालन दोन्ही आव्हानात्मक आहे व दोन्हीकडे तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता, हजरजबाबीपणा याचा वापर करावा लागतो, असे ते सांगायचे. आवाजाच्या क्षेत्रात ते अमिन सयानी यांना गुरुस्थानी मानायचे. सयानी यांचा ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम ते लहानपणापासून सातत्याने ऐकत आले. ‘लोकसत्ता’साठीही त्यांनी काही महिने ‘नाटय़समीक्षक’ म्हणूनही लेखन केले होते. मुंबई दूरदर्शन केंद्राचे संचालक मुकेश शर्मा यांनी दूरदर्शनचा चेहरामोहरा बदलण्यासाठी केलेल्या प्रयत्न केले. त्यांनी सुरू केलेल्या काही कार्यक्रमांचे निवेदन-सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली, असंही भिडेंनी मुलाखतीत म्हटलं होतं.
तेव्हाच्या बातम्या आणि आताच्या बातम्या…
दूरदर्शनच्या ‘बातम्या’ आणि आजच्या ‘वृत्तवाहिन्या’ या विषयीही त्यांनी भाष्य केलं होतं. दूरदर्शनच्या बातम्यांची आणि वृत्तनिवेदकांची स्वत:ची अशी शैली आहे. तिथे आकांडतांडव नसते. शब्दोच्चारांवर अधिक भर असतो. प्रमाण मराठी भाषा तिथे जपली जाते. शांत, संयमित अशा त्या ‘बातम्या’ असतात. त्या उलट आजच्या वृत्तवाहिन्या ‘कर्कश’ झाल्या आहेत. वृत्तवाहिन्यांवर बातम्या पाहायच्या व ऐकायच्या पण बातमीच्या मुळाशी जायचे असेल, साधक-बाधक विश्लेषण हवे असेल तर वृत्तपत्र वाचनाला आजही पर्याय नाही. चांगले वृत्तनिवेदक तयार होण्यासाठी आणि घडवण्यासाठी ‘वृत्तनिवेदक’ गुणवत्ता शोध स्पर्धा घेण्यात यावी. वृत्तनिवेदक किंवा सूत्रसंचालक यांच्या कामाला ‘मान्यता’ नाही. हे काम तुलनेत कमी दर्जाचे मानले जाते. अपवाद वगळता वृत्तनिवेदक/सूत्रसंचालकांना पुरस्कार दिले जात नाही, योग्य तो सन्मान मिळत नाही, याची खंत वाटते असे त्यांनी सांगितले होते.
पुनर्जन्म असेल तर…
आवाजाच्या क्षेत्रात काम करण्याची संधी परमेश्वराने मला दिली आणि त्याला मी योग्य न्याय देऊ शकलो, याबद्दल त्यांनी २०१७ च्या विशेष मुलाखतीमध्ये सामाधान व्यक्त केलेलं. पार्श्वगायक मोहमद रफी यांना भिडे दैवत मानायचे. याचाच संदर्भ देत मुलाखतीमध्ये, “जर पुनर्जन्म असेल तर देवाने पुढील जन्मात मला गायनाचे कौशल्य द्यावे, एवढीच त्याच्याकडे प्रार्थना आहे,” असं भिडे यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.