लहान मुलं म्हटलं की त्यांचं लडिवाळ बोलणं, हट्टीपणा करणं आणि मस्ती करणं हे ओघाओघाने आलंच. सुट्टीच्या दिवशी घरात धुडगूस घालणारी ही लहान मंडळी जेव्हा आई-वडिलांच्या ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी जातात तेव्हा त्यांची खरी धम्माल येते. आई-वडिलांचे मित्र-मैत्रिणी या चिमुकल्याचे लाड करण्यात व्यस्त असतात. तर दुसरीकडे आई-बाबा या मुलांना मस्ती करु नकोस असं वारंवार बजावत असतात. मात्र अनेक वेळा आईने सांगितलेली गोष्ट मुलं ऐकत नाहीत आणि त्यातूनच अनेक वेळा काही मजेदार किस्से घडतात. असंच काहीसं अमेरिकेमध्ये घडलं आहे. अमेरिकेमध्ये एका वृत्तनिवेदिकेच्या मुलाच्या मस्तीचा व्हिडीओ थेट लाईव्ह गेल्याचं दिसून आलं.

अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीत काम करमाऱ्या कर्टनी क्यूब ही निवेदिका आपल्या लहान मुलाला ऑफिसमध्ये घेऊन गेली होती. मात्र कर्टनी वृत्तनिवेदन करत असताना अचानक तिचा लहान मुलगा कॅमेरासमोर येऊन मस्ती करु लागला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

कर्टनी क्यूब ही सीरियामध्ये झालेल्या एअरस्ट्राइकविषयीची बातमी देत होती. याचवेळी तिचा लहान मुलगा कॅमेरासमोर येऊन मस्ती करु लागला. मात्र तरीदेखील त्याला सावरत कर्टनी बातमी सांगण्याचा प्रयत्न करत होती.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कर्टनी आणि या वृत्तवाहिनीचं कौतुक केलं आहे. या वृत्तवाहिनीमध्ये लहान मुलांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी असल्यामुळे अनेकांनी कौतुक केलं आहे. ‘वर्किंग मॉम लाइव्ह टीव्हीमध्ये देखील मल्टीटास्किंग काम करत आहे’, असं एका नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

Story img Loader