बार हा अनेकांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. कधी एकदा विकेंड येतो आणि आपण बारमध्ये जातो असे अनेकांना झालेले असते. मग आपल्या जिवलगांबरोबर विकेंड साजरा करण्याचे बेत आखले जातात. परदेशात तर आठवड्याच्या दिवशीही बारमध्ये जाणे ही फार विशेष गोष्ट नाही. आता माणसाला बारमध्ये जाताना पाहिले तर त्यात काही अप्रूप नाही. पण फ्रान्समध्ये चक्क एक घोडाच बारमध्ये शिरला. हो ऐकायला काहीसे वेगळे वाटेल पण ही गोष्ट प्रत्यक्षात घडली आहे. पॅरीसमध्ये शर्यतीतला एक घोडा चक्क बारमध्येच शिरला. बारमध्ये शिरल्यानंतर या घोड्याने थेट तेथील फर्निचर पाडायला सुरुवात केली. हा सर्व प्रकार बारमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. मुख्य म्हणजे अशाप्रकारे अचानक घोडा आत आल्याने बारमधील कर्मचारी आणि नागरिक यांची एकच धांदल उडाली. घोड्याला घाबरुन दारातून बाहेर पडण्यासाठी सगळ्यांनी बाहेर पडण्याच्या दारात एकच गर्दी केली.
रेसकोर्सवरुन राईड झाल्यावर हा घोडा आपल्या मालकासोबत जात होता. मात्र अचानक त्याने आपला रस्ता सोडला आणि तो काही अंतर दूर गेला. त्यानंतर तो थेट बारमध्येच शिरला. तो इतक्या जोरात बारमध्ये धावत आला की त्याठिकाणी बसलेले सगळे ग्राहक घाबरुन इकडे-तिकडे पळायला लागले. घोड्यांना अशाप्रकारे पळून जायची सवय असते असे त्या घोड्याची मालक असलेल्या महिलेने माध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितले. पण अशाप्रकारे बारमध्ये जाणे हे काहीसे अपवादात्मक असल्याचेही ती म्हणाली. सुदैवाने यामध्ये घोड्यासह कोणीही जखमी झाले नाही. मग या घोड्याच्या ट्रेनरने त्याला अतिशय शिताफीने बाहेर काढले. मात्र यामध्ये बारचे काही प्रमाणात नुकसान झाले. बारचा मालक असलेल्या स्टीफन जस्मिन याने या घटनेचा व्हिडियो काढला. इतकेच नाही तर हा व्हिडियो त्याने सोशल मीडियावर शेअरही केला. मग अतिशय कमी वेळात तो सोशल मीडियावर व्हायरलही झाला.