Andheri Metro Station Viral video : मुंबईत लोकांना चालण्यासाठी रस्त्यांच्या बाजूने पदपथ बांधले आहेत. पण, अनेकदा हे पदपथ बघून प्रश्न पडतो की, नक्की हे लोकांना चालण्यासाठीच बनवलेत की, फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी? कारण मुंबईत रेल्वेस्थानक असो, बस स्टँड असो; जिथे बघावं तिथे सगळीकडे फेरीवाल्यांचा वावर दिसून येतो. काही रेल्वेस्थानकांबाहेर लोकांना धड चालण्यासाठीही नीट जागा नाही, पण फेरीवाले मात्र आरामात रस्ता व्यापत व्यवसाय करताना दिसतात. अनेकदा मुंबईतील फेरीवाले आणि लोकांमधील वादाचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. सध्या मुंबईतील अंधेरी मेट्रो स्थानकाबाहेरील एका फेरीवाल्या महिलेचा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात ती अनधिकृत फेरीवाली महिला पदपथावर चालणाऱ्या व्यक्तीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत चक्क चाकूने मारायला धावते. त्यामुळे हा धक्कादायक व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा, नेमकी यात चूक कोणाची आहे…

अंधेरी मेट्रो स्थानकाबाहेर नेमकं काय घडलं?

व्हिडीओमध्ये एक अंडी विकणारी फेरीवाली महिला संतापून एका व्यक्तीवर चाकूने हल्ला करण्यासाठी धावते, यावेळी तीन जण मिळून तिला अडवतात. पण, तरीही ती अतिशय अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत त्या व्यक्तीला धमकावताना दिसतेय. ही घटना अंधेरी मेट्रो स्थानकाबाहेरील असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर महिलेवर कठोर कारवाईची मागणी करत पालिकेविरोधात संताप व्यक्त केला आहे. अशा दादागिरी करणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात पालिका काय कारवाई करणार, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.

महिला फेरीवालीने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली अन्…

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, अंड्याचे पदार्थ विकणाऱ्या एका महिला फेरीवालीचे पदपथावरून चालणाऱ्या एका व्यक्तीबरोबर काही कारणावरून भांडण झाले, हे भांडण तिने रस्त्यावर लावलेल्या अनधिकृत दुकानावरून झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पण, हे भांडण इतके टोकाला पोहोचले की, महिलेने अतिशय असभ्य भाषेत त्या व्यक्तीला शिवीगाळ केली. धक्कादायक म्हणजे ती रागाच्या भरात चाकू घेऊन त्या व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी धावली, पण सुदैवाने तिथे काही लोक होते ज्यांनी तिला अडवले आणि तिच्या हातातील चाकू काढून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आजबाजूला बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.

अंधेरीतील घटनेचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

अनेकांनी ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आणि सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला, त्यामुळे सोशल मीडियावर या घटनेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. बहुतेकांनी महिलेविरोधात कठोर कारवाई करून तिचे अनधिकृत दुकान हटवण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा – CIDCO Lottery 2024 : सिडको लॉटरीसाठी कसा करावा ऑनलाइन अर्ज? आवश्यक कागदपत्रं अन् पात्रता काय? सर्वकाही वाचा एका क्लिकवर

दरम्यान, या प्रकरणी संबंधित महिला फेरीवाली विरोधात अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पण, मुंबईतील फेरीवाल्यांच्या दादागिरीची ही पहिलीच घटना नाही, यापूर्वी अनेक अशा घटना समोर आल्यात. मात्र, पालिका प्रशासन अशा फेरीवाल्यांवर तात्पुरती कारवाई करून सोडून देते, त्यामुळे अशा मुजोर फेरीवाल्यांची हिंमत आणखी वाढते आणि ते थेट लोकांवर जीवघेणा हल्ला करण्यासाठी धावून जातात.