Andheri Railway Station Viral Video : देशाची आर्थिक राजधानी म्हणवणाऱ्या मुंबईतील अनेक रेल्वेस्थानकांवर शौचालयांची दुर्दशा झाली आहे. बऱ्याच शौचालयांत श्वास घेणंही मुश्कील होऊन जातं. त्यात महिलांच्या शौचालयांची अवस्था तर इतकी भयानक आहे की, तिथे जाणं काय उभं राहणंही अतिशय किळसवाणा अनुभव असतो. सध्या मुंबईतील अंधेरी रेल्वेस्थानकातील अशाच एका शौचालयाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यातील दृश्य पाहून तुम्हाला प्रश्न पडेल की, सुविधांच्या नावाखाली रेल्वे प्रशासन महिला प्रवाशांच्या जीवाशी खेळतंय.
मुंबईतील अंधेरी हे सर्वाधिक गर्दीचे रेल्वेस्थानक आहे. लाखो लोक या स्थानकावर ट्रेन पकडण्यासाठी येतात. मात्र, तिथे महिला प्रवाशांसाठी असलेल्या शौचालयाची स्थिती फार गंभीर आहे. याबाबत shw_etzzz नावाच्या एका महिलेने इन्स्टाग्रामवर एक भलीमोठी पोस्ट केली आहे. त्यात तिने, रेल्वे प्रशासन सुविधांच्या नावाखाली आपल्याकडून जो पैसा घेते, त्याचा योग्यरीत्या वापर केला जातो की नाही की त्याचा गैरवापर होतोय, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
तिने पोस्टमध्ये सांगितले की, ती आणि तिचा भाऊ एसी ट्रेनने विरारहून वांद्र्याला जाण्यासाठी निघाले. यावेळी वांद्र्याला जाणारी स्लो ट्रेन पकडण्यासाठी ते अंधेरीला उतरले. कारण- त्यावेळी थेट वांद्र्याला जाण्यासाठी ट्रेन उपलब्ध नव्हत्या. यावेळी प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट पाहत असताना मला तातडीने शौचालयात जायचे होते.
यावेळी जेव्हा तिने रेल्वेस्थानकावरील महिलांच्या शौचालयात प्रवेश केला तेव्हा तिथली परिस्थिती पाहून तिला धक्काच बसला. अतिशय अस्वच्छ आणि कोणालाही त्याचा वापर करणे कठीण होईल, असे ते शौचालय होते. तिथे ना कचरापेटी होती, ना पाणी, तिथे एकूणच खूप अस्वच्छता होती. कोणतीही महिला शौचालय इतके अस्वच्छ आणि घाणेरडे असेल, अशी अपेक्षाही करू शकत नाही.
त्यामुळे प्रश्न पडतो की, रेल्वे प्रशासनाला आपण सुविधांसाठी जो पैसा देतो, त्याचा योग्य वापर होताय की नाही की फक्त गैरवापर होतोय. अंधेरीसारख्या मुख्य रेल्वेस्थानकावर शौचालयाची अशा बेफिकीरपणे देखभाल केली जात असेल, अशी अपेक्षाही कधी केली नव्हती. त्याहूनही निराशाजनक गोष्ट म्हणजे बाहेर एक पुरुष अशा घाणेरड्या शौचालयाचा वापर करण्यासाठी प्रवेश शुल्क आकारत होता. त्यामुळे आपण नेमके कशासाठी पैसे देत आहोत, असा प्रश्न पडतो.
त्यामुळे माध्यमांनी या मुद्द्याच्या बाबततील लक्ष घालावे, अशी मागणी तिने केली आहे. तसेच पश्चिम रेल्वे प्रशासनानेही या प्रकरणी कडक कारवाई करावी, अशी मागणी करीत रेल्वे स्थानकावरील शौचालयांत स्वच्छतेबाबत काही कडक नियम केले पाहिजेत, असे तिने म्हटले आहे.
तुम्ही महिलेने पोस्ट केलेल्या व्हिडीओत पाहू शकता की, अंधेरी स्थानकातील एका शौचालयात सर्वत्र वापरलेले सॅनिटरी पॅड्स टाकून ठेवले होते, तिथल्या एका पिलरवर वापरलेल्या पॅड्सचा अक्षरश: खच पडला होता. इतकेच नाही तर तिथल्या खिडकीवर दारूची रिकामी बाटली, सॅनिटरी पॅड्स ठेवलेले होते. धक्कादायक बाब म्हणजे शौचालयात पाण्याची सुविधा नव्हती. त्यामुळे तेथे महिला प्रवाशांना मोठ्या गैरसोईंना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, या घटनेवर लोकांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे.
अनेकांनी व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये याबाबत रेल्वे प्रशासनावर राग व्यक्त करीत कडक कारवाईची मागणी केली आहे. एका युजरने लिहिलेय की, अतिशय दयनीय स्थिती आहे, यावरून आपण भरत असलेला कर नेमका कुठे जातो हे दिसून येते. महिलांना वापरण्यायोग्य मूलभूत आणि सुरक्षित सेवा-सुविधा असल्या पाहिजेत; पण त्या नाहीत. त्यामुळे या भयानक परिस्थितीसाठी रेल्वे अधिकाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे. काहींनी, ही परिस्थिती फारच भयानक असल्याचे म्हटलेय. काहींनी, सरकारला शिव्या देण्यापूर्वी त्या लोकांना इतकी समज असायला हवी की, कचरा डस्टबिनमध्ये टाकावा. तो असा ठेवू नये. स्वच्छता कर्मचारीही माणसे आहेत. जर त्या लोकांना समजत असतं, तर अशी परिस्थिती दिसली नसती.