हल्ली ‘थीम वेडिंग’चा ट्रेंड सुरू झाला आहे. अनेक लोकांची थीम वेडिंगला पसंती मिळत आहे. यात एखादी संकल्पना ठरवून, त्याप्रमाणे लग्नसोहळा पार पाडला जातो. आंध्र प्रदेशमधले अध्यात्मिक गुरु श्रीधर स्वामी यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी दैवदैवतांची थीम ठेवली. त्याप्रमाणे त्यांच्या मुलीच्या लग्नाला वऱ्हाडी मंडळी चक्क देवी-देवतांचे रूप धारण करून आले होते. दागदागिने भरजरी साड्या, डोक्यावर मुकुट अशा वेशात लग्नाला पाहुणे आले होते.
वाचा : सौंदर्याने घात केला; अधिकाऱ्याने विमानतळावरच अडवले
श्रीधर स्वामी यांचा आश्रमदेखील आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग आंध्र प्रदेशमध्ये आहे. आपल्या मुलीचं लग्न एखाद्या पौराणिक कथेतील विवाहाप्रमाणे व्हावं असा त्यांचा अट्टहास होता. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या या विवाह सोळ्यासाठी त्यांची कन्या लक्ष्मीदेवीच्या वेशात लग्न मंडपात आली, तर तिचा होणार नवरा भगवान विष्णूंच्या वेशात आला. अध्यात्मिक गुरु श्रीधर स्वामी आणि त्यांच्या पत्नीने देखील देवतांसारखी वस्त्रे परिधान केली होती. एखाद्या पौराणिक मालिकेचं चित्रकरण सुरु असल्याप्रमाणे त्यांचा लग्न मंडप सजवण्यात आला होता. या लग्नसोहळ्याचे व्हायरल झालेले फोटो पाहून अनेकांचे डोळे पांढरेफट्ट पडले नसतील तर नवल.