दुचाकी चालवताना चालकाच्या सुरक्षेसाठी हेल्मेट गरजेच आहे. आपल्या देशात दरवर्षी हजारो लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. यातल्या अनेकांचा हेल्मेट न घातल्यामुळे डोक्याला मार लागून मृत्यू होतो असं एका अहवालातून समोर आलं आहे. वाहतुकीचे साधेसोपे नियम आहेत. आपल्या वैयक्तिक सुरक्षेसाठी प्रत्येकाने ते पाळलेच पाहिजे , पण भारतात असं होताना दिसत नाही.
वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांचा डोळ्यांदेखत मृत्यू झाल्याचं कित्येक लोकांनी पाहिलं असेल. तरीही लोक वारंवार त्याच चुका करतात. आपल्यासोबत इतरांचंही आयुष्य धोक्यात घालतात. वाहतूक पोलीस याबद्दल जनजागृती करतात पण पालथ्या घडावर पाणी. शेवटी लोकांच्या अशा बेजबाबदार वागण्यापुढे एका पोलिसाने हात टेकले. आंध्र प्रदेशमधले पोलीस निरिक्षक बी शुभ कुमार यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रस्ते सुरक्षा आणि अपघात या विषयावर बोलण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. दीड तास चाललेल्या या कार्यक्रमात फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती देखील कुटुंबासोबत उपस्थित होता.
शुभ कुमार यांचे व्याख्यान ऐकून त्याच्यावर काडी मात्र परिणाम झाला नाही. आपल्या दोन मुलांना दुचाकीच्या टाकीवर आणि मागे पत्नी आणि आई असं पाच जणांचं कुटुंब घेऊन तो दुचाकीवरून चालला होता. एकानेही हेल्मेट घातलं नव्हतं. शुभ यांनी त्याला वाटेत अडवले. रस्ते सुरक्षा आणि वाहतुकीवर एवढं समजून सांगितल्यानंतरही त्याच्यावर काहीच फरक पडला नाही हे पाहून शेवटी हतबल होऊन कुमार यांनी त्याच्यापुढे हात टेकले. ‘लोकांच्या घराघरात जाऊन आम्ही लोकांना समजावतो. रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबाबदद्ल सांगतो. एवढी जनजागृती मोहिम राबवूनही लोक ऐकायला तयार नाही हे माझ्यासाठी खूपच त्रासदायक आहे, याव्यक्तीपुढे मी हात टेकले खरे, पण अपराधी वाटवण्यापेक्षा तो फक्त स्मित हास्य करून माझ्यासमोरून निघून गेला. हे त्यापेक्षाही वाईट होतं’ असं सांगत कुमार यांनी आपली नाजारी व्यक्त केली.
वाचा : मालिकेचा सेट नव्हे, हा तर आध्यात्मिक गुरूंच्या मुलीचा लग्नमंडप