सोशल मीडियावर सध्या एका कर्मचाऱ्याच्या वागणुकीबद्दल एक्स [पूर्वीचे ट्विटर] या माध्यमावर देतीने [Deity] नावाच्या व्यक्तीने तक्रार केल्याची पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपनीचा एक डिलिव्हरी करणारा कर्मचारी आपल्या वडिलांशी अतिशय उद्धटपणे बोलल्याचे देतीने आपल्या शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले आहे. एखादे पार्सल किंवा कुरिअर ताब्यात घेण्यापूर्वी ग्राहकाला एक ओटीपी [OTP] येतो; जो आलेल्या डिलिव्हरी कर्मचाऱ्याला सांगितल्यावर तो आपले पार्सल आपल्याला देतो. परंतु काही कारणांमुळे देतीच्या वडिलांना तो ओटीपी शोधता येत नव्हता, तेव्हा तो कर्मचारी अतिशय वाईट पद्धतीने बोलला असल्याचे समजते.
ऑनलाइन ऑर्डर केलेले एखादे पार्सल देताना ते योग्य व्यक्तीकडे पोहोचते आहे ना याची खात्री करण्यासाठी हा ओटीपी मागितला जात असतो. जेव्हा देतीचे वडील फ्लिपकार्टवरून मागवलेली वस्तू घेण्यासाठी फोनमध्ये आलेला ओटीपी शोधात होते तेव्हा त्यांना तो सापडत नव्हता. त्या वेळेस फ्लिपकार्ट कर्मचाऱ्याने चिडून त्यांना, “तुम्हाला जमत नाही, तर गोष्टी मागवता कशाला?” असे सुनावले.
हेही वाचा : बापरे! काही क्षणांत पाण्याचा झाला बर्फ! पाहा हिमाचल प्रदेशातील व्हायरल होणारा ‘हा’ व्हिडीओ
“यापुढे मी कधीही त्यांच्याकडून काही मागवणार नाही. आपल्या ग्राहकाशी बोलण्याची ही पद्धत नाही,” असेदेखील देतीने [Deity] आपल्या @gharkakabutar एक्स हॅण्डलवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
ही पोस्ट शेअर होताच, फ्लिपकार्टने त्वरित त्यावर प्रतिक्रिया दिली. त्यामध्ये त्यांनी, “आम्ही अशा प्रकारांकडे अगदी गांभीर्याने लक्ष देतो. तुमच्यासोबत असे घडले, त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. घडल्या प्रकाराबद्दल कारवाई करण्यासाठी कृपया तुम्ही तुमच्या ऑर्डर डिटेल्स आम्हाला पाठवा. तुमची माहिती आमच्याकडे सुरक्षित राहील.” असे लिहिले होते.
या पोस्टवर नेटकऱ्यांनीदेखील अनेक प्रतिक्रिया दिल्याचे समजते.
“एखाद्या मोठ्या व्यक्तीला उलट उत्तर देणं किंवा वाईट बोलणं हे किती चुकीचं आहे. ग्राहक असो वा नसो कोणाचाही आदर करणं हे आधी गरजेचं आहे,” असे एकाने म्हटले. दुसऱ्याने, “फ्लिपकार्ट नुसती फसवण्याची कामं करत असते आणि ते तुम्हाला तुमचे रिफंडचे पैसेसुद्धा परत करीत नाहीत. अतिशय वाईट सेवा आहे त्यांची. त्यापेक्षा दुसऱ्या ठिकाणाहून वस्तू मागवाव्यात,” असे म्हटले. तिसऱ्याने, “लोकांना इतरांना बडबडण्यात काय मिळतं काय माहीत. हे काकांसोबत झालं ते वाईट झालं,” असे लिहिले आहे. “ऐकून फारच वाईट वाटलं. यापुढे कधीही फ्लिपकार्टमधून काही मागवणार नाही,” असे शेवटी चौथा नेटकरी म्हणाला.
या पोस्टला एक्स या सोशल मीडियावर तब्बल ६७ हजार व्ह्युज मिळाल्या आहेत.