नुकत्याच एका व्हायरल व्हिडिओमध्ये, एका ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या ग्राहकाने कंपनीच्या सेवांवर नाराजी व्यक्त करत स्कूटरची मोडतोड केली. व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ओला शोअरूमसमोर पडलेल्या स्कूटर हातोड्याने फोडतो. त्यानंतर इतर काही लोकही हातोड्याने स्कूटर पूर्णपणे मोडून टाकतात. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “शोअरूमने ₹९० हजार रुपायांचे बिल दिल्याने संतप्त ग्राहकाला राग अनावर झाला आणि रागाच्या भरात स्कूटर फोडली.”
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ओला इलेक्ट्रिकच्या खराब ग्राहक सेवांवरून अनेकांनी टीक केली. याआधी, कॉमेडियन कुणाल कामराने ओला सीईओ भाविश अग्रवाल यांच्यावर ग्राहक सेवांसह ताशेरे ओढले होते. कामराने एका ओला सर्व्हिस सेंटरमध्ये असलेल्या स्कूटरच्या गर्दीचा फोटो शेअर करत ट्विट केले, “भारतीय ग्राहकांना आवाज आहे का? अनेक दैनंदिन कामगारांसाठी दुचाकी म्हणजे त्यांची जीवनवाहिनी आहे. अशा स्थितीत त्यांना हे सहन करावे लागते?”
u
u
u
कामराच्या या ट्विटला अग्रवाल यांनी उत्तर देत त्याच्या आरोपाला “पेड ट्विट” म्हटले. त्यांनी लिहिले, “कुणाल, तुला एवढी काळजी असेल तर येऊन आम्हाला मदत कर. मी तुला या पेड ट्विटपेक्षा किंवा तुझ्या अपयशी कॉमेडी करिअरपेक्षा जास्त पैसे देईन. नाहीतर गप्प बस आणि आम्हाला खऱ्या ग्राहकांचे प्रश्न सोडवू दे. आम्ही सेवा केंद्र वाढवत आहोत आणि प्रलंबित काम लवकरच संपवू.”
ओला इलेक्ट्रिक स्कूटर आणि वीज बिल
ओला इलेक्ट्रिक स्कूटरची लोकप्रियता वाढत असली तरी, ग्राहक वीज बिलासंदर्भातही चिंता व्यक्त करत आहेत. अनेक वापरकर्त्यांनी सांगितले आहे की, स्कूटर चार्ज करण्यासाठी लागणारी वीज सरासरीपेक्षा जास्त खर्चीक ठरते. एका अहवालानुसार, ओला इलेक्ट्रिक स्कूटर १०० किलोमीटरसाठी सरासरी ३.५-४ युनिट वीज खर्च करते. यामुळे वीज बिलात महिन्याला ₹४५०-₹६५० पर्यंत वाढ होऊ शकते, जो त्याचा वापर आणि चार्जिंग वेळांवर अवलंबून आहे.
हेही वाचा –‘एक चूक अन् खेळ खल्लास!’ धावत्या रेल्वेच्या छतावर धावतेय तरुणी, काळजात धडकी भरवणारा Video Viral
ओला इलेक्ट्रिकने जरी इंधन बचत आणि पर्यावरणपूरकतेवर भर दिला असला, तरी ग्राहक सेवांमधील त्रुटी, उच्च देखभाल खर्च आणि वीज बिलाचा बोजा यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे ओलाला ग्राहकांच्या समस्या सोडवण्यावर भर द्यावा लागणार आहे.