Lion Buffalo Fight Viral Video : जंगलातील सर्वात मोठा शिकारी प्राणी म्हणून सिंहाला ओळखलं जातं. त्याच्या हातात आलेली शिकार सहसा सुटत नाही. अगदी वाघ, बिबट्या आणि इतर अनेक बलाढ्य प्राणीदेखील सिंहाला घाबरतात. तुम्ही सिंहाने केलेल्या शिकारीचे अनेक व्हिडीओ पाहिलेच असतील, ज्यात सिंह अतिशय क्रूरपणे प्राण्यांची शिकार करताना दिसतात. पण, सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात तीन म्हशी शिकारीसाठी आलेल्या सिंहाच्या कळपाला अशी काही आपली ताकद दाखवतात की पाहून तुम्ही व्हाल शॉक. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही जाणीव होईल की कधीच कोणाला कमी समजू नये, कारण कधी डाव उलटेल काही सांगू शकत नाही.

या व्हिडीओमध्ये सहा म्हशींनी मिळून जंगलाच्या राजाला चांगलीच अद्दल घडवली आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका म्हशीवर सहा ते सात सिंहांच्या एका कळपाने हल्ला केला, पण पुढच्याच क्षणी दोन म्हशींनी तिथे एन्ट्री घेतली त्यानंतर म्हशींचाही मोठा कळप धावू आला आणि सिंहांना सळो की पळो करून सोडलं.

सहा म्हशी सिंहांच्या कळपाशी अतिशय बिनधास्तपणे भिडताना दिसतायत. यातील एकीला सिंहांच्या कळपाने आधी टार्गेट केले, एक सिंह म्हशीच्या पाठीवर जाऊन बसला, दुसऱ्याने तिला खाण्याचा प्रयत्न केला, तर इतर सिंह तिला मिळेल तिथून बोचकारत होते. याचवेळी अचानक दोन पिसाळलेल्या म्हशींनी एन्ट्री घेतली आणि सिंहांना शिंगांवर उचलून दूर फेकू लागल्या. अशाप्रकारे त्यांनी सिंहांच्या तावडीत सापडलेल्या म्हशीची सुटका केली. यानंतर सहा म्हशींनी मिळून सिंहाच्या कळपाशी भिडू लागल्या. समोर येणाऱ्या सिंहाला त्या सरळ शिंगावर उचलून दूर फेकत होत्या, त्यामुळे म्हशींच्या शक्ती, धाडसापुढे सिंह असहाय्य झाले.

म्हशींचा आक्रमकपणा पाहून अखेर सिंहांनी घेतली माघार (Lion Buffalo Fight Viral Video

म्हशींनी शिंग आणि प्रचंड शारीरिक ताकद वापरून सिंहांना दूर पळवून लावण्यास सुरुवात केली. म्हशींचा आक्रमकपणा पाहून अखेर सिंहांना माघार घ्यावी लागली. व्हिडीओत स्पष्ट दिसतेय, म्हशींसह झुंज देताना दमलेले सिंह अखेर एकामागून एक कसे पळून जातायत आणि म्हशी त्यांचा पाठलाग करतायत. जंगलातील सिंह आणि म्हशींच्या या झुंजीतून कोणाविरोधातही लढताना एकता आणि धाडस किती महत्त्वाचे असते हे दिसून येईल. सोशल मीडियावरील लोक हा व्हिडीओ पाहून चकित झाले आहेत. अनेक जण म्हशींच्या शौर्य, धाडसाचे कौतुक करत आहेत.

जंगलातील हा व्हिडीओ @gunsnrosesgirl3 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये, ‘कठीण काळात साथ देणारे मित्र बनवा’ असे लिहिले आहे. दरम्यान, या व्हिडीओवर अनेक जण कमेंट्ससुद्धा करतायत. एकाने लिहिले की, “गरजेच्या वेळी मदत करणारा मित्र हा खरा मित्र असतो”, दुसऱ्याने लिहिले की, “म्हशी हुशार असत्या तर बरे झाले असते, त्यांना सिंहांना त्यांच्यापेक्षा अधिक प्रभावीपणे रोखता आले पाहिजे, पण बऱ्याचदा त्या पळून जातात.”