पुण्यात अजूनही अपघातांचे सत्र सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात पोर्श अपघाताची घटना चर्चेत आली होती त्यानंतर वारंवार अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर काल (ता. १६) बसचा आणि टॅक्टरचा अपघात झाला. दरम्यान पुण्यात काल आणखी एका अपघाताची चर्चा सुरु होती.
पुणे शहरातील डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळील गरवारे भुयारी मार्गात मंगळवारी पहाटे वेगात असलेली कार नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकावरून आदळली आणि भुयारी मार्गात कोसळली. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास जंगली महाराज रस्त्यावरून फर्ग्युसन कॉलेज रोडच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाचे गरवारे पुलाजवळ नियंत्रण सुटले आणि ती थेट भुयारी मार्गात कोसळून दुभाजकावर जाऊन धडकले. पाषाण येथील मनोज कलगुडे हा त्याच्या दोन मित्रांसह कारमध्ये होता. हे तिघे जेवण करून परतत असताना कारचा अपघात झाला. चालकाला किरकोळ दुखापत वगळता कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण हा आघात इतका मोठा होता की वाहनाच्या एअरबॅग सक्रिय झाल्या, असे पोलिसांनी सांगितले.
अपघातानंतर कार क्रेनने बाजूला काढतानचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. इंस्टाग्रामवर punerifeeds आणि1.punekarनावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार कार जंगली महाराज रस्त्यावरून फर्ग्युसन कॉलेज रोडच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कारे रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या लोखंडी पाईप रेलिंग तोडले ज्यामुळे सबवेच्या प्लास्टिक फायबर कव्हरचे नुकसान झाले आणि समोरील बंपर, दोन्ही हेडलाइट्स कारचे बरेच नुकसान झाले. सुदैवाने, अपघाताच्या वेळी भुयारी मार्गात कोणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे अधिक दुखापत किंवा जीवितहानी टळली. या प्रकारणाचा तपास पोलिस करत आहे.