न्यूयॉर्क पासून दिल्ली येथे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात २६ नोव्हेबर रोजी एक बीभत्स प्रकार घडला होता. दारुच्या नशेत असलेल्या एका प्रवाशाने विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये ७० वर्षीय वृद्ध महिलेवर लघुशंका केली होती. या प्रकरणाची दखल टाटा ग्रुपने घेतली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा असाच एक प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ६ डिसेंबर रोजी पॅरीसहून दिल्लीला येणाऱ्या विमानात एका दारुच्या नशेत असलेल्या प्रवाशाने एका महिला प्रवाशाच्य ब्लँकेटवर लघुशंका केली. संतापजनक प्रकार म्हणजे या प्रवाशाने लेखी माफिनामा दिल्यामुळे त्याच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
हे ही वाचा >> अन् विमान हवेत असतानाच त्या प्रवाशाने महिलेच्या अंगावर केली लघुशंका; Air India मधील बीभत्स प्रकार
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या फ्लाईट १४२ ने ६ डिसेंबर रोजी पॅरीस ते दिल्ली प्रवास केला होता. या फ्लाईटमध्ये सदर बीभत्स प्रकार घडल्यानंतर दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ट्राफिक कंट्रोलला याबाबतची तक्रार देण्यात आली. फ्लाईट लँड होताच दारुड्या प्रवाशाला सीआयएसएफने (Central Industrial Security Force) पकडले देखील. मात्र केवळ लिखित स्वरुपात माफिनामा दिल्यामुळे या व्यक्तीला सोडून देण्यात आले होते. त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या महिला प्रवाशासोबत सदर प्रकार घडला त्या पोलिस तक्रार दाखल करण्यासाठी तयार नव्हत्या. त्यामुळे आरोपी आणि पीडिता यांच्यात माफिनाम्यावर संमती झाल्यानंतर दोघांनाही सोडून देण्यात आले.
आधीच्या प्रसंगात काय घडले होते
२६ नोव्हेंबर २०२२ रोजी एअर इंडियाची फ्लाईट AI-102 न्यूयॉर्कच्या के जॉन एफ केनेडी विमानतळावरुन दिल्ली येथे येत होती. दुपारी जेवणानंतर विमानातले दिवे बंद करण्यात आले. याचवेळी नशेच्या अमलाखाली असलेला एक व्यक्ती पीडित वृद्ध महिलेजवळ आला आणि त्याने थेट अंगावरच लघुशंका केली. या बीभत्स प्रकार केल्यानंतरही दारुडा व्यक्ती त्याच ठिकाणी उभा होता. विमानातील इतर प्रवाशांनी त्याला त्याच्या जागेवर जाण्यासाठी सांगितल्यानंतरच तो तिथून निघाला.
हे ही वाचा >> Air India peeing case : लघुशंका केलेल्या सीटवरच महिलेला बसवलं? सहप्रवाशाने सांगितलं ‘त्या’ दिवशी विमानात नेमकं काय घडलं!
एअर इंडियाने दाखल केली तक्रार
टाटा ग्रुपचे चेअरमन यांना पत्र लिहिल्यानंतर आता एअर इंडियाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सदर घटना घडून गेली असली तरी याबाबतची पोलिस तक्रार करण्यात आली आहे. या व्यक्तीवर कलम २९४ (सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे), ३५४, ५०९, ५१० या कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या दारुड्या प्रवाशाला ‘नो फ्लाई लिस्ट’ मध्ये टाकण्यात आले आहे.