काल म्हणजेच १७ सप्टेंबरला संपूर्ण देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले. देशातील तसेच जगभरातील अनेक मान्यवरांनी मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी वाढदिवसाच्या दिवशी आपल्या मातोश्रींची भेट घेण्यासाठी गुजरातला जातात. मात्र यंदा त्यांना ही भेट घेता आली नाही. यावर्षी नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर मध्यप्रदेशात होते. येथे त्यांनी नामिबियातून आणलेले चित्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडले.
नामिबियातून आणलेले चित्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडल्यानंतर पंतप्रधानांनी जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, आज मी माझ्या आईला भेटण्यासाठी जाऊ शकलो नाही. मात्र, मध्य प्रदेशातील आदिवासी भागातील इतर समाजाच्या खेड्यापाड्यात काम करणाऱ्या लाखो माता आज मला येथे आशीर्वाद देत आहेत. दरम्यान अभिनेता अनुपम खेर यांच्या मातोश्रींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये खेर यांच्या आई आहेत. त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलंय. ‘माझ्यासह देशातील हजारो मातांचा आशीर्वाद नरेंद्र मोदी यांच्याबरोबर आहे.’ अनुपम खेर त्यांना विचारतात, ‘तुला ते आवडतात का?’ यावर त्या म्हणतात, ‘ते मला आवडतात की नाही हे मला माहित नाही, पण ते तुमच्यापेक्षा जास्त चांगले आहेत. मोदींना शुभेच्छा! त्यांना कधी ना कधी भेटता यावं ही माझी इच्छा आहे.’
दरम्यान, अनुपम खेर यांच्या मातोश्रींच्या या व्हिडीओवर अभिनेत्री कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, ‘आई नेहमीच आमच्या चेहऱ्यावर हसू आणतात. देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो.’ यावर अनुपम खेर यांनी, ‘धन्यवाद’ अशी कमेंट केली आहे.