‘इंडिया वाँट्स टू नो!’
आपल्या मधुर आवाजात समोरच्याची रोज रात्री ९ वाजता बोलती बंद करणाऱ्या अर्णब गोस्वामीभाऊंचं दर्शन सध्या दुर्लभ झालंय म्हणा. जवळपास एकट्याच्या जिवावर ‘टाईम्स नाऊ’चा डोलारा सांभाळणारे अर्णब गोस्वामी आता स्क्रीनवर येत नसल्याने सगळ्यांना आपल्या टीव्हीचे स्पीकर वगैरे बिघडलेत की काय अशी रोज रात्री ९ वाजता शंका येते . पण नाही नाही, सगळं सुस्थितीत आहे.
पण याच अर्णबना त्यांच्याच शोवर इतके दिवस येणाऱ्या एका व्यक्तिमत्त्वाने निरूत्तर केलं. एरव्ही भल्याभल्यांची पळता भुई थोडी करणाऱ्या अर्णब गोस्वामींना वेसण घालणं तसं प्रचंड कठीण काम. आपल्या शोमध्ये त्यांनी भल्याभल्यांच्या विकेट्स काढल्यात. मी मी किंवा आम्ही आम्ही म्हणणारे (वाईट होता) अनेक जण गोस्वामींच्या स्टुडिओमध्ये आल्यावर गपगार होतात. या सगळ्यांची झाडाझडती गोस्वामी घेतात, प्रसंगी त्यांना त्यांच्या कार्यक्रमातून हाकलून लावतात. पण तरीही आंग्लभाषेत स्वत:चा जाहीरपणे,जास्तीत जास्त अपमान करून घ्यायला त्यांच्या कार्यक्रमांत यायला सगळ्यांची गर्दी व्हायची.
बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ!
अशा या आंग्लवक्त्तृत्वकलाप्रवीण वाक्चतुर अर्णबाला गप्प बसवण्याची किमया साधली ती आपल्या साध्यासुध्या अनुपम खेर यांनी
अनुपम खेर तसे इंटलेक्चुअल अॅक्टर. अनेक सिनेमांमध्ये त्यांनी विनोदी, गंभीर, खलनायकी भूमिका केलेल्या असल्या तरी अॅक्टिंगमधला त्यांचा अभ्यास गाढा आहे. प्रत्यक्ष जीवनात ते काहीसे मितभाषी आहेत.
अशा या अनुपम खेरांनी अर्णब गोस्वामींना गप्प बसवण्याची किमया केली. तेही तब्बल ३८ सेकंद…पहा तर
‘Anything Is Possible’!!! We at @actorprepares managed to keep #ArnabGoswami still & quiet 4 sometime. #MannequinChallengeWithArnab. #JaiHo pic.twitter.com/RLcM2CknoU
— Anupam Kher (@AnupamPkher) February 1, 2017
अनुपम खेर यांच्या ‘अॅक्टर प्रिपेर्स’ या अॅक्टिंग स्कूलला अर्णब गोस्वामींनी भेट दिली होती. त्यावेळी या दोघांनी ‘मॅनेकिन चँलेंज’चा हा व्हिडिओ शूट केला. त्यात अर्णब ३० सेकंदांपेक्षा जास्त काळ गप्प राहिले. मॅनेकिन चॅलेंजमध्ये ज्यांचा व्हिडिओ काढला जातोय त्यांना पुतळ्यासारखं स्थिर राहावं लागतं. साहजिकच त्यांना शूटिंगदरम्यान काही बोलता येत नाही.हा व्हिडिओ अनुपम खेर यांनी ट्वीट केल्यावर त्यांच्यावर ‘कौतुकाचा वर्षाव’ झाला. काहींनी अनुपम खेर यांना जागतिक शांततेसाठी नोबेल पारितोषिक दिलं जावं अशी शिफारस केली. तर काहींनी ही वादळापूर्वीची शांतता असल्याचा खेर यांना इशारा दिला.
VIRAL VIDEO: काॅपी करायची तर अशी (नाही)
काहीही असलं तरी अर्णब गोस्वामींनी त्यांच्या खास शैलीने भारतीय टेलिव्हिजनमध्ये आपली एक खास जागा बनवत अफाट लोकप्रियता कमावली. त्यांच्याविषयीची कुठलीही बातमी असेल तरी त्यावर म्हणूनच नेटिझन्स आणि टीव्हीसमोर बसलेल्यांच्या उड्या पडतात.