तुम्ही महिन्याला किती रुपये कमावता? २० हजार? ५० हजार? १ लाख? २ लाख? तुमच्या लेखी मध्यम वर्गीयांची व्याख्या काय? मध्यमवर्गीयांना साधारण किती पगार असतो? समजा तुम्ही महिन्याला ५० हजार रुपये कमावताय आणि स्वतःला मध्यमवर्गीय म्हणवताय, तर तुम्ही चुकताय मित्रांनो आणि मैत्रिणींनो. कारण, तुम्ही खरंतर मध्यम वर्गीय म्हणजेच मिडल क्लास नाही तर लोअर मिडल क्लास (निम्न मध्यम वर्ग) वर्गातील आहात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे असं आम्ही मध्येच का सांगतोय. तर एका नेटकऱ्याने मांडलेल्या आर्थिक वर्गीकरणानुसार मध्यम वर्गीयांची व्याख्याच बदलली आहे. अर्थात ही व्याख्या काही सर्वव्यापी किंवा अधिकृत नाही. पण मध्यमवर्गीयांबाबत त्याने मांडलेलं गणित पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात १२ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त केल्याची घोषणा केली. ही घोणषा होताच सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला. दरम्यान, भारतातील उत्पन्नातील असमानतेवर प्रकाश टाकणारी एका एक्स वापरकर्त्याची पोस्ट व्हायरल झाली आहे, यामुळे ऑनलाइन चर्चा सुरू झाली आहे.

“फक्त आयटी क्षेत्रातील लोकच १२ लाखांपर्यंतच्या कर सवलतीबद्दल ओरडत आहेत. आयटी क्षेत्रात नसलेल्या अनेकांसाठी ७-१० वर्षांच्या अनुभवानंतरही १२ लाख पगार हा स्वप्नवत पगार आहे. २४ लाखांपेक्षा अधिक कमावणाऱ्या या आयटी लोकांनी स्वतःला निम्न मध्यमवर्गीय म्हणवून घेणे थांबवावे. १२ लाख विसरून जा – भारतातील नोकरदार वर्गाचा सरासरी पगार तपासा आणि तुमचा दर्जा पहा. २४ लाख पगार घेऊन तुम्ही गरीब असल्यासारखे वागताय? कृपया हा मूर्खपणा थांबवा”, असे एकाने पोस्टमध्ये म्हटले आहे.

यावर प्रतिक्रिया देताना, एका फिनटेक उत्साही व्यक्तीने असा दावा केला की दरवर्षी ६० लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेला प्रत्येक व्यक्ती गरीब आहे. त्याने स्पष्ट केले की ७०% उत्पन्न हे जीएसटी आणि व्हॅटसारखे कर म्हणून कापले जातात आणि दरमहा २ लाख रुपये कमावणारा मध्यमवर्गीय आहे. “महिन्याला दोन लाख निव्वळ उत्पन्न असलेला मध्यमवर्गीय आहे. ६० ते १ कोटी रुपये कमावणारे लोक मध्यमवर्गीय आहेत. १ कोटीपेक्षा जास्त कमावणारे लोक उच्च मध्यमवर्गीय आहेत. जर तुमच्याकडे पिढीजात संपत्ती नसेल तर तुम्ही श्रीमंत नाही”, असं या नेटकऱ्याने म्हटलं आहे.

“जर तुम्ही ६० लाख रुपये वर्षाला कमवत असाल तर तुम्हाला मेट्रो शहरात फ्लॅट घेण्यासाठी किमान ५-६ वर्षे लागतील”, असे नेटकऱ्याने पुढील पोस्टमध्ये म्हटले आहे. पिढीजात संपत्तीबाबत केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी समर्थन केलंय. तर ६० लाख उत्पन्न असलेल्या व्यक्तीला गरीब म्हटल्याप्रकरणी अनेकांनी या नेटकऱ्याची खिल्ली उडवली आहे.

“चार लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेले लोक कमी उत्पन्न गटात येतात. ४-८ लाख कमावणारे कनिष्ठ मध्यम वर्ग, ८-१२ लाख कमावणारे मध्यम वर्ग, १२-१५ लाख कमावणारे उच्च मध्यम वर्ग, १५-२० लाख उत्पन्न असणारे उच्च वर्ग”, अशी कॉमेंट एकाने केली आहे. “जर ६० लाख-१ कोटी मध्यम वर्ग असेल, तर १२ लाख म्हणजे काय? दारिद्र्यरेषेखालील? हे अर्थशास्त्र नाही”, असंही दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. दरम्यान, मूळ पोस्टकर्त्याने अत्यंत उपहासात्मक पोस्ट लिहिली आहे. त्यावर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. पण एकवेळ नक्की अशी येईल की ६० लाख उत्पन्न असलेलाही मध्यमवर्गीय म्हणूनच गणला जाईल, असंही एकाने म्हटलं आहे.