आजपर्यंत अनेक कथा-कादंबऱ्यांमधून किंवा चित्रपटांमधून आयआयटीतील विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमधील जीवनाविषयी अनेक रंजक गोष्टी आपल्याला माहिती झाल्या आहेत. मात्र, मुंबई आयआयटीतर्फे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात आणखी एक आश्चर्यचकित करणारी माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणानुसार मुंबई आयआयटीतील तब्बल ७० टक्के विद्यार्थी रोज आंघोळ करत नाहीत. यापैकी १० टक्के विद्यार्थी तर आठवड्यातून एकदाच आंघोळ करतात. आयआयटीमधून २०१६ साली उत्तीर्ण झालेल्या तुकडीतील ३३२ विद्यार्थी या सर्वेक्षणात सहभागी झाले होते. या सर्वेक्षणात केवळ विद्यार्थ्यांच्या आंघोळीच्या सवयींविषयीच नव्हे तर विद्यार्थी महाविद्यालयात असताना काय करायचे, महाविद्यालयीन जीवन संपल्यानंतर काय करतात, विद्यार्थ्यांच्या धार्मिक मान्यता आणि लग्नाविषयीचे विचार याबाबतही प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी अनेक गोष्टींविषयीची गंमतीशीर माहिती पुढे आली. ही माहिती आयआयटीमधील विद्यार्थ्यांच्या आजपर्यंतच्या प्रतिमेला काहीप्रमाणात छेद देणारी आहे. सर्वेक्षणात आयआयटीतील ७० टक्के विद्यार्थ्यांनी तिकीटाशिवाय ट्रेनने प्रवास केल्याचेही सांगितले. याशिवाय, महाविद्यालयीन जीवन संपल्यानंतर मित्रांची साथ तुटल्याचे दु:ख सर्वाधिक असल्याचेही अनेक विद्यार्थ्यांनी म्हटले. त्यामुळे महाविद्यालयीन जीवन आणखी काही काळ असावे, असे मत ४० टक्के विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. मात्र, त्याचवेळी २७ टक्के विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर घरी जाण्याची तर १९ टक्के विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनानंतर एकटे राहण्याची इच्छा बोलून दाखविली.
लग्नाच्याबाबतीत आयआयटीच्या ४० टक्के विद्यार्थ्यांनी त्यांना लग्न करायचे नसल्याचे सांगितले. तर २१ टक्के विद्यार्थ्यांनी येत्या चार ते पाच वर्षात लग्न करायचे असल्याचे सांगितले. मात्र, ३१ टक्के विद्यार्थी लग्नाच्या निर्णयाविषयी अजूनही विचार केला नसल्याचे दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा