अॅपल आयफोन ७ हा ७ सप्टेंबरला लाँच करण्यात आला. अॅपलच्या फोनची क्रेझ अनेकांवर आहे. त्यामुळे आयफोन सिरिजमध्ये आणखी नवा फोन येणार म्हटल्यावर अॅपल प्रेमी जवळपास वेडेच झाले होते. आपल्या दहावी, बारावीच्या रिझल्टची देखील इतक्या आतुरतेने वाट पाहिली नसेल इतकी वाट आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लसची वाट अनेकांनी पाहिली. अखेर नवा आयफोन कसा असणार याचे आपल्या दृष्टीने असलेले रहस्य एकदाचे उलगडले. पण या फोनचे फिचर्स जाणून घेतल्यावर अवघ्या काही मिनिटांत खरी मज्जा सुरू झाली.
आयफोनची किंमत ही जवळपास ६० हजारांपासून सुरू आहे. त्यामुळे या आकड्यामुळे बिचा-या अॅपलप्रेमींच्या आनंदावर विरजण घातले गेले. हा फोन लाँच होऊन २४ तासही उलटले नसतील तर जगभरातील नेटीझन्सने आपापली विनोदबुद्धी वापरून या किंमतीवर विनोद करण्याचा जणू जंगच बांधला आहे. आता अॅपलचा हा फोन विकत घ्यायचा म्हणजे घरातल्या काही वस्तू तरी नक्की विकाव्या लागतील अशा स्वरुपाचे विनोद असे काही सुरू झाले की ते काही थांबायचे नावच घेत नाही. त्यामुळे या फोनपेक्षा या फोनवर आलेले विनोद जास्त चर्चेचा भाग बनत चालला आहे. त्यातून रेड एफएमने बनवली फेसबुक पोस्ट तर जास्तच हिट होत आहे. अॅपल फोन येण्याआधी आणि येण्यानंतरच्या प्रतिक्रियाची विनोदी व्हिडिओ क्लिप त्यांनी फेसबुकवर टाकली. हे विनोद इथेच थांबले नाही. कोणाचे काय तर कोणाचे काय म्हणतात तसे अनेकांनी तर सोशल मीडियावर अॅपल आयफोन ७ पेक्षा अॅपल ५ ची किंमत कमी होणार याचा आनंद साजरा केला. आता ७ घेऊ तेव्हा घेऊ पण किमान आयफोन ५ ची किंमत तरी खाली उतरेल आणि हा फोन आपण घेऊ असेही विनोद सुरू आहेत.
ते तर सोडाच पण या विनोदवीरांनी तर मोदी आणि रामदेव बाबा आणि सलमान खानला देखील सोडले नाही. अॅपल फोनचे लाँचिंग आणि या तिघांचे उगाचच एकमेकांशी संबध सोडून बनवलेले जोक्स व्हायरल होत आहे. आता आपल्या सारख्या सामान्य माणसाच्या खिशाला हे फोन परवडणार नाही त्यामुळे हा फोन आला काय अन् गेला काय आपल्याला काही फरक पडत नाही, पण निदान या अॅपलवरचे विनोद वाचून तरी काही काळ चेह-यावर हसू आणू अशी मानसिकता नेटीझन्सची झाली आहे. त्यामुळे तुम्ही देखील अशाच विनोदांचा आनंद घ्या.

Story img Loader