तुम्ही जर आयफोन वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण- सध्या सोशल मीडियावर आयफोन चार्जिंगसंदर्भातील एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओत iPhone 15 चार्ज करताच चार्जर अधिक गरम होत जळत असल्याचे दिसत आहे. यावेळी चार्जर जळून त्यामधून धूर येत असल्याचेही दिसतेय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आयफोन युजर्सनी अधिक सावध राहण्याची गरज आहे.
सोशल मीडिया युजर @gracesalons ने @apple ला हा व्हिडीओ टॅग करीत लिहिले की, ‘हे चार्जर ॲपल कंपनीचे आहे आणि ते एका आउटलेटमध्ये प्लग केले गेले होते. मात्र, या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, या महिलेच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली आहे.
आयफोन युजर्सना काळजी घेण्याची गरज
या पोस्टमध्ये ॲपलच्या इतर युजर्सनादेखील आयफोन चार्जिंगला लावून झोपू नका, असा सल्ला देण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘हा काय प्रकार आहे @Apple, मी माझा iPhone 15 चार्ज करताना वापरत होतो आणि अचानक वायर केबल जळू लागली. मला समजेपर्यंत नुकसान झाले होते. कृपया, झोपताना तुमचा फोन चार्जिंगला लावून ठेवू नका. कारण- यामुळे परिस्थिती आणखी धोकादायक होऊ शकते. @Apple ने आणखी नवीन फोन विकण्यापूर्वी त्याची गुणवत्ता पुन्हा तपासली पाहिजे.
या पोस्टवर अनेकांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याच वेळी अनेकांनी याच्या ऑथेंटिसिटीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. एका युजरने लिहिले, “ॲडॉप्टर बनवाट असण्याची शक्यता आहे.” दुसऱ्याने लिहिले, “माझ्याबरोबरही असेच घडले.” तिसऱ्याने लिहिले, “जेव्हा मी Apple Store मधून नवीन केबल विकत घेतली तेव्हा माझ्या iPhone 11 चार्जरबाबतीतही असेच घडले.”