आजच्या काळात तंत्रज्ञान ही आपल्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची गोष्ट बनली आहे. मोबाईल, स्मार्टवॉच आणि घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू याच्याद्वारे दररोज आपण तंत्रज्ञानाची मदत घेत असतो. अॅपलसारखी कंपनी तर एकाहून एक आकर्षक फिचर्ससाठी अतिशय प्रसिद्ध आहे. अॅपलने नुकतेच असे फीचर आणले आहे ज्यामुळे हृदयरोगाशी झुंज देणाऱ्या लोकांना आराम मिळणार आहे. त्याबरोबरच आपातकालिन स्थितीत उपयोगी पडतील अशी फिचर्सही कंपनीने आणत ग्राहकांची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेनुसार, अॅपल वॉच ४ मधील एका फीचरमुळे एका व्यक्तीचा थोडक्यात जीव वाचला आहे. फॉल डिटेक्शन असे या फीचरचे नाव असून हे तंत्रज्ञान त्या व्यक्तीसाठी जीवदान देणारे ठरले आहे.
स्वीडनमध्ये जेवण तयार करताना एका व्यक्तीचा पाय घसरला. तेव्हा त्याच्या कंबरेला चांगलाच मार लागला. अशा परिस्थितीत या व्यक्तीला जागेवरुन उठणेही अशक्य झाले होते. तो ज्याठिकाणी पडला त्याच्या बाजूलाच स्टोव्ह होता, त्यामुळे परिस्थिती जीवावर बेतणारी होती असे या व्यक्तीने सांगितले. परंतु नशीब बलवत्तर असल्याने आपण घातलेल्या अॅपल वॉच ४ मधील फॉल डिटेक्शन फीचर सुरु होते, त्यामुळे जीव वाचला असे त्या व्यक्तीने सांगितले. हातात असणाऱ्या घड्याळातील या फीचरमुळे या व्यक्तीच्या सासूच्या फोनवर याची सूचना मिळाली. मेसेज मिळाल्याने त्या घाईनेच याठिकाणी पोहोचल्या. आपल्या जावयाला त्वरीत रुग्णालयात दाखल करुन वेळीच उपचार सुरु झाल्याने या पडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचण्यास मदत झाली.
घड्याळातील Gyroscope 32 G Force या फीचरमुळे व्यक्ती किती जोरात पडला आणि त्याला किती इजा झाली याची नोंद घेतली जाते. मग पडलेल्या व्यक्तीला एक अलर्ट पाठवला जातो. हे घड्याळ घातलेला व्यक्ती जर चांगल्या अवस्थेत असेल तर तो आलेले नोटीफीकेशन बंद करु शकतो. अन्यथा युजरला मदतीची गरज असल्यास वॉचमधून ६० सेकंदाच्या आत इनर्जन्सी क्रमांकावर लोकेशनबरोबरच मेसेज पाठवला जातो, वरच्या घटनेतही हेच घडले होते. या फीचरची आणखी एक विशेष बाब म्हणजे तुमचे वय ६५ वर्षांहून जास्त असेल तर हे फीचर तुमच्या घड्याळात चालूच राहते. मात्र त्याखालील वयोगटाच्या लोकांना हे फीचर मॅन्युअली ऑन करावे लागते. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या वापराने अपघाताच्या स्थितीत व्यक्तीच्या मदतीला धावून येणारे हे घड्याळ निश्चितच उपयुक्त आहे असे म्हणावे लागेल.