देशाचे रक्षण करण्यासाठी जवान कायमच तत्पर असतात. आपल्या जीवाचा विचार न करता ते अहोरात्र देशातील जनतेसाठी सीमेवर खडा पहारा देत असतात. युद्धभूमीवर किंवा दहशतवादाला तोंड देताना त्यांना आपला जीवही गमवावा लागतो. मात्र, शहीद झाल्यानंतर या जवानांच्या कुटुंबावर काय परिस्थिती ओढवते, याबाबत एका वीरपत्नीने एक पोस्ट लिहीली आहे. संगीता अक्षय गिरीश या वीरपत्नीने लिहलेली ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

संगीता यांची गोष्ट ऐकून आपणही नकळत भावूक होतो. आपले पती अक्षय गिरीश आणि तीन वर्षांची मुलगी नैना यांच्यासोबतचे आपले आयुष्य कसे चांगले होते, हे त्या सांगतात. त्या लिहीतात, अक्षय यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या पोस्टींगमुळे लग्नानंतर अनेक गोष्टी एकटीलाच कराव्या लागत. मात्र तरीही आम्ही सगळे अतिशय आनंदात होतो. त्या म्हणतात, नोव्हेंबर महिन्यात एक दिवस अचानक बंदुकीच्या फैरी ऐकून आम्ही ५.३० वाजता उठलो. त्यानंतर ग्रेनेडचाही आवाज आला. काही वेळातच अतिरेक्यांनी हल्ला केल्याचा निरोप आला आणि क्षणाचाही विलंब न करता अक्षय आपल्या वर्दीत निघालेही. जाताना या सगळ्या घटनेवर तू नक्की काहीतरी लिही, असेही त्यांनी मला सांगितले.

Video : ‘या’ मुलामुळे आनंद महिंद्रा झाले प्रेरित; कोणतेही काम कठीण नसल्याचे ट्विट

पुढचा बराच वेळ आर्मी स्टेशनमधील आम्ही महिला आणि त्यांची मुले काही माहिती मिळते का, याची वाट पहात होतो. काही वेळाने नेमके काय झाले असेल याबाबत, मला भीती वाटायला लागली. शेवटी न राहवून ११.३० वाजता मी अक्षय यांच्या मोबाईलवर फोन केला. त्यावेळी त्यांच्या तुकडीतील एकाने फोन उचलला आणि मेजर अक्षय दुसऱ्या ठिकाणी गेले असल्याचे सांगितले. संध्याकाळपर्यंत वाट पाहील्यानंतर अखेर माझी भीती खरी ठरली आणि अक्षय यांचा मृत्यू झाल्याची बातमी आली. त्यावेळी माझं आयुष्य क्षणात उद्ध्वस्त झाल्याची भावना मनात दाटून आली. मी त्यांना एकदा मेसेज केला असता, एकदा मिठी मारली असती, एकदाच ‘आय लव्ह यू’ म्हटले असते, एकदाच गुडबाय म्हटले असते, असे मला प्रकर्षाने वाटले आणि मी एकच आक्रोश केला. माझ्या जीवाचे दोन भाग झालेत, असे मला पुढचा कितीतरी काळ वाटत राहीले, असे संगीता यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. ‘बिईंग यू’ या फेसबुक पेजने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Story img Loader