McDonald’s Big Change: देशभरात टोमॅटोच्या दरवाढीमुळे अनेक ग्राहक चिंतेत आहेत. काही टोमॅटो पिकवणाऱ्या भागात मुसळधार पाऊस आणि जूनमध्ये सामान्य तापमानापेक्षा जास्त उष्णतेमुळे पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाला, ज्यामुळे यावर्षी भावात पाचपट वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर फास्ट फूड चेन मॅकडोनाल्डने भारतातील अनेक भागांमध्ये त्यांच्या बर्गर आणि रॅप्सच्या रेसिपीत मोठा बदल करण्याचे ठरवले आहे. यासंदर्भात दिल्लीतील काही भागात मॅकडोनाल्डने नोटीस सुद्धा लावली आहे.
मॅकडोनाल्ड्स रेस्टॉरंटच्या बाहेर चिकटवलेल्या नोटीसचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यानुसार येत्या काही दिवसांपर्यंत टोमॅटो हे बर्गर्स व रॅप्समधून वगळण्यात येणार आहे. सेबीचे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आदित्य शाह यांनी ही पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे. ‘टोमॅटोची तात्पुरती अनुपलब्धता’ असे परिपत्रक फास्ट-फूड चेनने त्यांच्या लेटरहेडवर जारी केले होते. त्यात म्हटले आहे की मॅकडोनाल्ड्सला टोमॅटो परवडण्यात अडचणी येत आहेत आणि म्हणून त्यांना टॉमेटोशिवाय आपले पदार्थ सर्व्ह करावे लागत आहेत.
“आम्ही तुम्हाला सर्वोत्कृष्ट व सर्वोत्तम अन्न देण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमचे सर्वोत्तम प्रयत्न असूनही, आमच्या जागतिक दर्जाच्या तपासण्या पार करणारे टोमॅटो आम्हाला परवडणाऱ्या दरात व पुरेशा प्रमाणात मिळू शकले नाहीत, पण खात्री बाळगा, आम्ही टोमॅटोचा पुरवठा परत सुरु करण्यासाठी काम करत आहोत.”
मीडियाला दिलेल्या निवेदनात, कॅनॉट प्लाझा रेस्टॉरंट्स मॅकडोनाल्ड्स फ्रँचायझी अंतर्गत सुमारे १५० आउटलेट चालवतात, त्यांनी हा निर्णय तात्पुरत्या महागाईमुळे घेण्यात आल्याचे सांगितले आहे. मात्र, वेस्टलाइफ फूडवर्ल्ड, (भारताच्या पश्चिम आणि दक्षिणेकडील मॅकडोनाल्डची फ्रेंचायझी) यांच्या ३५७ रेस्टॉरंट्समध्ये “टोमॅटोशी संबंधित कोणतीही गंभीर समस्या” नसल्याचे समजतेय. काही दिवसांपूर्वी १०% ते १५% स्टोअरला तात्पुरते टोमॅटो देणे बंद करावे लागले होते मात्र आता सेवा पूर्ववत झाल्या आहेत असे सांगण्यात येत आहे.