Ashadhi Ekadashi 2024: दरवर्षी आषाढी एकादशीचा मोठा उत्साह संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळतो. यंदाही मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी साजरी केली जात आहे. विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात आणि राज्यातील विठ्ठल मंदिरांमध्ये भक्तांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, ज्या लोकांना कामामुळे पंढरपूरला जाता आलेलं नाही, त्यांच्यासाठी पंढरीच मुंबईच्या रेल्वेत, रेल्वेस्थानकावर अवतरलेली दिसली. राज्यभरात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक दाखल होत आहेत. मुंबईतही विठुरायाचे भक्त वारकरी रंगात रंगले आहेत.
सीएसमटी, चर्चगेटला फुलला विठ्ठलभक्तीचा मळा
विठु-माऊलीचा जागर करीत मराठी माणूस टाळ-मृदुंग घेऊन विठ्ठलभक्तीत तल्लीन झाला आहे. सध्या चंद्रभागेतीरी विठ्ठलभक्त वैष्णवांचा मेळा जमला आहे. मात्र, लहानपणापासून गावाकडे आषाढी एकादशीची पूजा करणारे आणि पंढरपूरच्या वारीचं महत्त्व जाणून उपवास करणारे जेव्हा मुंबईत येतात, तेव्हाही ते आपल्या विठ्ठलभक्तीची साक्ष देतात. सीएसमटी स्थानकाप्रमाणेच मुंबईतील चर्चगेट स्थानकावरही आज विठ्ठलभक्तीचा मळा फुललेला दिसला. लोकलच्या गर्दीत दररोज आपल्याच धुंदीत चालणारे पाय जेव्हा टाळ-मृदुंग ऐकून थांबले, कानडा राजा पंढरीचा हे गाणं गाऊ लागले, माऊली माऊली करून एकमेकांना नमस्कार करू लागले, पांडुरंगाचं दर्शन घेऊ लागले, तेव्हा चर्चगेट स्थानकातही भक्तीचा मळा फुलल्याचं दिसून आलं.
अभंग, भजन, कीर्तनाने भक्तिमय वातावरण
आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट स्थानकावर मुंबईकरांनी आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला. रेल्वे प्रवासी भजनी मंडळाच्या वारकरी संप्रदायाच्या दिंड्यांमध्ये वारकऱ्यांनी अभंग, भजन, कीर्तन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विठू माझा लेकुरवाळा… कानडा राजा पंढरीचा… माऊली माऊली… या गाण्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर दणाणून गेला होता.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> ‘छोटीशी रखुमाई…’आषाढी एकादशीनिमित्त चिमुकलीचा खास लूक VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
चर्चगेट, सीएसएसटी स्थानकावरील हा वैष्णवांचा मेळा गावाची अन् पंढरीच्या पांडुरंगाची साक्ष देत होता. मुंबईकरांनाही आषाढी एकादशीच्या उत्सवाची महती येथील वारकरी नकळत सांगून जात होते. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सध्या २४ तास दर्शनासाठी खुलं करण्यात आलं आहे.