Viral Video : २९ जूनला आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रभरातून लाखो वारकरी माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहे. या दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे संपन्न झाले. या रिंगणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये टाळ-मृदंगाच्या तालावर दोन अश्व रिंगणात दौड करताना दिसत आहेत. एका अश्वावर माऊली तर दुसऱ्या अश्वावर चोपदार भगवी पताका घेऊन बसलेले दिसत आहे. आजूबाजूला दुतर्फी रांगेत वारकरी टाळांच्या गजरात विठू माऊलीचा जयघोष करताना दिसत आहेत. अगदी वारीचा उत्साह वाढवणारे हे दृश्य आहे.
ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील हे पहिले उभे रिंगण होते. चांदोबाचा लिंब येथे वारकऱ्यांनी हा रिंगण सोहळा अनुभवला. रिंगण हा वारीचा आनंद द्विगुणित करणारा सोहळा असतो. अश्वांच्या टापांखालील माती कपाळी लावण्यासाठी वारकरी एकच गर्दी करतात.
chala_warila_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “टाळ-मृदंगाचा ध्वनी अश्व दौडले रिंगणी…”
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण आज चांदोबाचा लिंब येथे संपन्न झाले.”