Poor Quality Food Served In Vande Bharat Train : देशभरातील अनेक राज्यांमध्ये वंदे भारत ट्रेनच्या सुविधांमध्ये वाढ केली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधांनी सुसज्ज या गाड्या प्रवाशांच्या चांगल्याच पसंतीस उतरल्या आहेत. अनेक प्रवासी यातून सुखद प्रवासाचा आनंद घेत आहे. वंदे भारतमध्ये प्रवाशांना नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा देण्यात येते, मात्र यासाठी प्रवाशांना वेगळे शुल्क भरावे लागते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून वंदे भारत ट्रेनमध्ये निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ दिले जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या, यात पुन्हा एकदा एका प्रवाशाने वंदे भारत ट्रेनमधील निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थाचा फोटो पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कपिल नावाच्या एका युजरने वंदे भारत ट्रेनमधील जेवणाच्या निकृष्ट दर्जासंदर्भात एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्याने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग करत पोस्टमध्ये लिहिले की, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव जी हेल्दी फूड दिल्याबद्दल धन्यवाद. त्यात ना तेल ना मिरची मसाला, असे हे वंदे भारतमधील जेवण. याबरोबर त्याने छोलेच्या भाजीचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात खरोखरचं उकडलेल्या छोलेचं पाणी दिसत आहे. अनेकांनी ही पोस्ट पाहिल्यानंतर रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. तर काहींनी रेल्वे प्रशासनाच्या सुविधेवर मिश्किल टिप्पणी करत मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
एका युजरने लिहिले की, आजकाल ह्रदयविकाराच्या झटक्याने जास्त मृत्यू होत आहेत. त्यामुळे ही रेसिपी प्रत्येक घरापर्यंत पोहचली पाहिजे, अश्विनी वैष्णव जी यांनी निरोगी भारतासाठी दिलेल्या योगदानाबद्दल धन्यवाद. यावर आणखी एका युजरने लिहिले की, ही रेसिपी खूपच धोकादायक दिसतेय. तिसऱ्या एका युजरने मजेशीर कमेंट करत लिहिले, मला वाटले रसगुल्ला आहे, नंतर झूम इन करुन पाहिले तेव्हा लक्षात आले छोले आहेत.