युनायटेड एअर लाईन्सच्या कर्मचा-यांनी एका डॉक्टरला  विमानातून खेचून बाहेर काढल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विमान कर्मचा-यांच्या या मनमानी कारभारामुळे आणि असभ्य वर्तनामुळे मोठ्या प्रमाणात वाद सुरू झाला असून सोशल मीडियावर या कंपनीवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी ९ एप्रिल रोजी या विमान कंपनीचे विमान शिकागोवरून ल्यूइसवेलला जायला निघाले होते. विमानाचे सर्व तिकिट आरक्षित झाले होते आणि याच वेळी या कंपनीच्या एका कर्मचा-यालाही ल्यूइवेलला जायचे होते पण विमानात सीट रिकामी नसल्याने विमानात असलेल्या आशियायी वंशाच्या एका डॉक्टरला त्याची सीट या कर्मचा-याला देण्यात यावी आणि त्याने दुस-या विमानाने इच्छित स्थळी जावे असे सांगण्यात आले, पण त्याने ठाम नकार दिला. तेव्हा या विमानातील तीन कर्मचा-यांनी येऊन त्याला आपल्या जागेवरून फरफटत बाहेर नेले. या प्रवाशाच्या दोन्ही हातांना पकडून अत्यंत असभ्य वर्तन करत जमीनीवरून त्याला फरफटत विमानातून बाहेर काढण्यात आले. आजूबाजूचे प्रवासी मात्र या प्रसंगामुळे पुरते हादरून गेले. या झटापटीत डॉक्टरच्या चेह-याला इजा झाली असल्याचेही समजते आहे.

आपल्या कर्मचा-याला याच विमानाने जाता यावे यासाठी कोणी आपली तिकिट देते का? असे अनेकदा विचारण्यात आले होते. त्याबदल्यात त्या प्रवाशाला नुकसान भरपाई आणि हॉटेलमध्ये राहण्याचा खर्चही विमानसेवेने देऊ केला असल्याचे एका प्रवाशाने स्थानिक वृत्तपत्रांना सांगितले होते पण एकही प्रवाशी आपली तिकिट द्यायला तयार नव्हता, तेव्हा विमान कर्मचा-यांनी आपला मोर्चा विमानात असलेल्या आशियायी दाम्पत्याकडे वळवला. त्यांनी आपली तिकिट देण्यास नकार दिला असता त्याला विमानातून अक्षरश: फरफटत बाहेर काढण्यात आले. या विमानात असलेल्या एका सहप्रवाशाने याचा व्हिडिओ काढून तो शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात या विमानसेवेवर टीका करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर या कंपनीच्या सीईओंनी या प्रकरणाची दखल घेत त्या प्रवाशाची माफी मागीतली आहे.