सध्या आसाममधील एका घटनेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. एका महिला पोलिसाने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला अटक केलीये. या महिला पोलिसावर सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय. महिलेनं नातं न बघता आपलं कर्तव्य बजावल्यानं नेटकरी तिचं कौतुक करत आहेत. नेमकं काय घडलंय आणि प्रकरण काय आहे, हे पाहुयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनमध्ये (ONGC) नोकरी देण्याचे आमिष दाखवून अनेकांना फसवणाऱ्या एका व्यक्तीला आसाम पोलिसांनी अटक केली. राणा पोगाग असं त्याचं नाव आहे. विशेष म्हणजे राणाविरोधात त्याची होणारी पत्नी आणि नागावची पोलीस अधिकारी जुनमोनी राभानेच तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीनंतर राणाला अटक करण्यात आली.

प्रकरण काय?

राणा पोगगने आपण आसाममध्ये ओएनजीसीमध्ये काम करत असल्याचं सांगितलं होतं. तसेच ओएनजीसी कंपनीत नोकरी देण्याच्या नावाखाली तो लोकांकडून पैसे उकळायचा. राणावर लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे, असं पोलिसांनी सांगितलं.  

खोटं बोलून महिला पोलिसाशी साखरपुडा

आसामच्या नागाव जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक जुनमोनी राभा यांच्याशी त्याने आपली ओळख जनसंपर्क अधिकारी म्हणून करून दिली. त्यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दोघांनी साखरपुडा केला आणि यावर्षी नोव्हेंबरमध्ये दोघांचे लग्न होणार होते. पण आपला होणारा पती लोकांची फसवणूक करत आहे, हे लक्षात येताच तिने एफआयआर दाखल केला आणि त्याला अटक झाली.

होणाऱ्या पतीच्या अटकेनंतर राभाची प्रतिक्रिया

“राणा पोगागने अनेकांची कोट्यावधींची फसवणूक केली आहे. त्याच्याबद्दल माझ्याकडे माहिती घेऊन आलेल्या तीन लोकांची मी आभारी आहे. त्यांच्यामुळेच मला त्याच्या फसवणुकीबद्दल माहिती मिळाली आणि त्याची अटक होऊ शकली,” असं राभा प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या.  

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assam cop junmoni rabha arrests fiance after she knew he is conman hrc