जगभरातल्या गिरीप्रेमींपासून ते अगदी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपर्यंत प्रत्येकालाच थेट अवकाशाला भिडण्याची स्पर्धा करणाऱ्या हिमालयाचं अप्रूप असतं. दरवर्षी हजारो गिरीप्रेमी हिमालयाला याची देही याची डोळा पाहाण्यासाठी आणि आयुष्यभर आठवणींमध्ये साठवण्यासाठी उत्तरेत चढाई करत असतात. पण चढाई करताना दिसणारा, जाणवणारा व अनुभवणारा हिमालय आणि अवकाशातून चहूदिशांना अजस्रपणे पसरलेला हिमालय या दोन्ही प्रचंड वेगळ्या गोष्टी आहेत. पण तरीही तितक्याच सुंदर! संयुक्त अरब अमिरातीचे अंतराळवीर सुलतान अल नेयादी यांनी अवघ्या जगाला याच गोष्टीची अनुभूती करून दिली आहे! तीही हजारो किलोमीटर वर अंतराळातून!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुलतान अल नेयादी हे सध्या सहा महिन्यांच्या अवकाश मोहिमेवर आहेत. सध्या ते अंतराळात स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये आहेत. तिथून पृथ्वी, चंद्र आणि इतर उपग्रहांची अत्यंत विलोभनीय, कधीही न पाहिलेली छायाचित्र ते त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर करत आहेत. नुकतीच त्यांनी आपल्या हिमालयाची काही छायाचित्र शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये हिमालय इतका विलोभनीय दिसत आहे की काही वेळातच हजारो लोकांनी ती पाहिली आणि पुन्हा शेअरही केली आहेत!

अल नेयादी यांनी ट्विटरवर शेअर केलेलं हिमालयाची छायाचित्र!

नेयादी यांनी त्यांच्या ट्वीमध्ये अवकाशातून बर्फाने झाकलेल्या हिमालयाचं छायाचित्र शेअर केलं आहे. एका छायाचित्रात कापूस पिंजून ठेवल्यासारखे ढग अवघ्या हिमालयाला कवेत घेऊन बसल्यासारखे दिसत आहेत. तर दुसऱ्या छायाचित्रात बर्फाच्छादित हिमालयाची अनेक शिखरं दिसत आहेत.

अल नेयादी यांनी ट्विटरवर शेअर केलेलं हिमालयाची छायाचित्र!

नेयादी यांचं ट्वीट

नेयादी यांनी आपल्या ट्वीटमध्ये त्यांना अवकाशातून दिसलेल्या हिमालयाचं वर्णन केलं आहे. “अवकाशातून दिसणारा हिमालय! एव्हरेस्ट समिटचं घर! पृथ्वीवरच्या समुद्रपातळीपासूनचा सर्वोच्च बिंदू…हिमालयातली ही शिखरं समृद्ध निसर्गाचं एक विलोभनीय चिन्ह आहे”, असं नेयादी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

नेयादी यांनी शेअर केलेल्या या फोटोंवर नेटिझन्सकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. अनेकांनी हिमालयाचं हे रूप कधीच पाहिलं नसल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी अवकाशातून हिमालय कसा दिसतो, हे दाखवल्याबद्दल नेयादी यांचे आभार मानले आहेत!

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astronaut sultan al neyadi shares pictures of himalaya from international space station pmw
Show comments