Glenn Maxwell and Vini Raman: ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार ग्लेन मॅक्सवेल लवकरच आपल्या भारतीय प्रेयसीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमन गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दरम्यान त्यांच्या लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तामिळ भाषेत असणारी ही पत्रिका पाहून अनेकजण कौतुक करत आहेत.
मॅक्सवेल आणि विनी २०१७ पासून एकमेकांना डेट करत आहेत. २०२० मध्ये दोघांनी साखरपुडा केला होता. करोनामुळे त्यांच्या लग्नाचा मुहूर्त चुकला होता. पण आता २७ मार्चला मेलबर्नमध्ये दोघेही भारतीय पद्धतीने विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती मिळत आहे.
मूळची भारतीय असणारी विनी ऑस्ट्रेलियात वास्तव्यास आहे. इंस्टाग्राम प्रोफाइलनुसार ती एक फार्मासिस्ट आहे. विनी मुळची भारतातील चेन्नईमधील असली तरी तिचा जन्म आणि शिक्षण ऑस्ट्रेलियात झालं आहे. तिथेच तिने फार्मसीचं शिक्षण घेतलं. विनीचे रमनचे वडील वेंकट रमन आणि आई विजयालक्ष्मी रमन तिच्या जन्माआधीच ऑस्ट्रेलियात वास्तव्याला गेले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मॅक्सवेल आणि विनी यांचं लग्न पारंपारिक तामिळ ब्राह्मण पद्धतीने होणार आहे. या लग्नात अनेक क्रिकेटर्स तसंच आंतरराष्ट्रीय पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
विनीची नातेवाईक नंदिनी सत्यमूर्ती यांनी केलेल्या ट्वीटनुसार, विनीच्या आई-वडिलांकडून तामिळ भाषेतील पत्रिका आपल्या संस्कृतीप्रती असलेला आदर दर्शवत आहे. हिंदू पद्धतीने हा विवाह व्हावा यासाठी ते तयारी करत आहेत.
दरम्यान मॅक्सवेलच्या करिअरबद्दल बोलायचं गेल्यास फलंदाजीसोबत फिरकी गोलंदाज म्हणूनही तो प्रसिद्ध आहे. आयपीएल २०२२ लिलावाआधी या अष्टपैलू खेळाडूला आरसीबीने ११ कोटींमध्ये रिटेन केलं होतं.