ऑस्ट्रेलियामध्ये एका कॅफेच्या मालकाने एका कुटुंबाला हॉटेलमधून बाहेर हाकलून दिल्याच्या घटनेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. त्या कुटुंबामध्ये दोन लहान मुले होती, जी आईसक्रीम न मिळाल्यामुळे सतत रडत होती. त्यांच्या रडण्याला आणि आरडाओरडीला वैतागून या मालकाने असे केल्याचे, न्यूयॉर्क पोस्टच्या एका वृत्तवारून समजते. लॉरा एडवर्ड असे त्या लहान मुलांच्या आईचे नाव आहे. एडेल्स कॅफेच्या मालकाने त्या कुटुंबाला तिथून निघून जायला तर सांगितलेच, मात्र तसे न केल्यास पोलिसांना बोलावू अशी धमकी दिल्याचेसुद्धा समजते. त्यामुळे लॉराने या कॅफेला बॉयकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावर केली होती.
लॉरा एडवर्डने, “एडेल्स कॅफे, अजिबात यांच्याकडे येऊ नका, अत्यंत घाणेरडा कॅफे आहे; या व्यवसायाला अजिबात प्रोत्साहन देऊ नका”, असे म्हणत या इटालियन कॅफेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओतदेखील आपल्याला लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकायला येऊ शकतो, असे न्यूयॉर्क पोस्टच्या लेखावरून समजते.
हेही वाचा : Viral video : वंदे भारत गाडीतील प्रवाश्यांनी अन्न चक्क फेकून दिले! काय आहे यामागचे कारण जाणून घ्या…
कॅफे मालकाचे ‘एड्रियन डॅलोस्टे’ असे नाव आहे. ती लहान मुलं १५ मिनिटांपासून सतत रडत होती, त्यामुळे इतरांना याचा त्रास होऊ नये यासाठी त्याने हे पाऊल उचलले असे मालकाचे म्हणणे आहे. “जेव्हा आम्ही त्यांना एक जिलेटो आईस्क्रीम दोघांमध्ये मिळून खावे लागेल असे सांगितले, तेव्हा ती दोन्ही मुलं रडू लागली. इतकेच नाही, तर काउंटरवर ठेवलेल्या वस्तू खाली जमिनीवर फेकून प्रचंड तमाशा करू लागले”, असे एड्रियनचे म्हणणे होते. “सलग १५ मिनिटे त्या मुलांनी रडून गोंधळ घातला होता, त्यामुळे कॅफेत बसलेल्या इतर कुटुंबाना, व्यक्तींना त्याचा त्रास होत होता”, असे कॅफे मालकाने न्यूयॉर्क पोस्टला माहिती देताना सांगितले.
एड्रियनने त्या कुटुंबाला सुरुवातीला अगदी शांतपणे तिथून जाण्यासाठी सांगितले. मात्र, त्याचे न ऐकल्यामुळे शेवटी पोलिसांना बोलावण्याची धमकी दिली. कॅफे मालकाच्या अशा वागण्यावर ते कुटुंब प्रचंड नाराज होते. मात्र, या प्रकरणाच्या दोन्ही बाजू समजल्यानंतर, एडेल्स कॅफेला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी सहानुभूती दाखवून कॅफे मालकच बरोबर आहे, असे म्हणत त्याचे समर्थन केले आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहा
हेही वाचा : सोशल मीडियावर व्हायरल होत आहे बिर्याणी-मॅगी रेसिपी; पदार्थ पाहून नेटकरी म्हणाले, “अरे देवा तो….
“या मालकाने अगदी योग्य केले आहे. मी त्याच्या जागी असते, तर मीदेखील हेच केले असते. मलाही लहान मुलं आहेत आणि ते जेव्हा लहान असताना असा रडारडीचा प्रकार करायचे, तेव्हा मी स्वतः माझे सर्व सामान घेऊन इतरांना त्रास होऊ नये यासाठी त्या ठिकाणावरून निघून जायचे”, असे एकाने लिहिले आहे. “पालकांनी आपल्या मुलांना इतरांचा आदर कसा करावा हे शिकवले पाहिजे, नाहीतर बाहेर गेल्यावर कसे वागायला हवे हे तरी सांगितले पाहिजे. जर दोन्ही शक्य नसेल तर स्वतः त्यांना घेऊन त्या ठिकाणाहून निघून गेले पाहिजे”, असे दुसऱ्याने लिहिले आहे. तिसऱ्याने, “प्रत्येक ठिकाणी हे असे केले पाहिजे” असे म्हटले आहे. चौथ्याने, “आधी आपल्या मुलांना योग्य सवयी लावून त्यांना सांभाळा” असे लिहिले आहे; तर शेवटी पाचव्याने, “एडेल्स कॅफे खरंच चांगला आहे आणि मी एड्रियनचे नक्कीच समर्थन करतो”, असे आपले मत मांडले आहे.